Just another WordPress site

यावल तालुक्यात घातक रसायन मिश्रित पन्नी गावठी दारूची खुलेआम विक्री

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यात बहुतेक ठिकाणी मानवी जिवनास अपायकारक अशा अत्यंत विषारी पदार्थाने बनविलेल्या पन्नी गावठी दारूची सर्रास खुलेआम विक्री केली जात असून सर्वत्र महापुर आल्याचे चित्र दिसून येत आहे.या पन्नी दारूच्या सेवनाने अनेक तरुणांना आपले जीव गमविल्यानुळे अनेकांचे कुटुंब व आयुष्य उद्धवस्त झाले आहे.याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासन यांनी तात्काळ या पन्नी दारूच्या विक्रीवर ठोस अशी कारवाई करून तालुक्यात कायमचा प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील महिला वर्गाकडुन करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यात यावल तालुका हा आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जाणारा तालुका आहे.या तालुक्यात ८५ गावे असून गोरगरीब नागरीक मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र मागील गेल्या दोन-तीन वर्षापासुन तालुक्यात विषारी घातक रसायन मिश्रण करून पन्नीची दारू तयार करून शहरी भागासह ग्रामीण भागात सार्वजनिक ठीकाणी सर्रास खुलेआम विक्री करण्यात येत आहे. अगदी सहज मिळणाऱ्या या पन्नीच्या दारूमुळे लहान मुलांपासुन तर विद्यालयीन तरुण वर्ग आकर्षक होवुन या दारूच्या आहारी जात व्यसनाधिन होत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात निर्माण झाले आहे.तसेच त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होवुन अनेकांचे कुटुंब उघडयावर आले आहे.यात या विषारी घातक रसायनाच्या पन्नी दारूमुळे अनेक तरूणांचा दुदैवीरित्या मृत्यु झाला असुन अनेक मृत्युच्या वाटेवर आहेत.याबाबत पन्नी दारू विक्रीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या की,प्रशासनाकडून थातुरमातुर देखाव्याची कारवाई करण्यात येऊन सारवासारव केली जाते.तरी उत्पादन शुल्क व पोलीसांनी कार्यवाहीमध्ये सातत्य ठेऊन तालुक्यातील पन्नी दारूचा कायमचा नायनाट करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील महिला वर्गाकडून करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.