यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली “प्राध्यापक प्रबोधिनी” कार्यक्रमांतर्गत ‘संशोधन-नैतिकता आणि अहवाल लेखन’ या विषयावर नुकतेच व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या निमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. ए.पी.पाटील व संजय पाटील उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्राध्यापिका डॉ.वैशाली एल.कोष्टी यांनी सामाजिक जीवनाचा शास्त्रीय अभ्यास करणे संशोधनाचा मुख्य उद्देश असतो.बदल ही नैसर्गिक बाब आहे आणि जेव्हा बदल होतो तेव्हा समस्याही निर्माण होतात. त्या समस्येच्या निराकरणासाठी संशोधन अनन्यसाधारण भूमिका निभवतो.त्याचबरोबर संशोधन निष्पक्षपाती होण्यासाठी काही नैतिक मूल्यांची गरज भासत असल्याने पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बाजूला ठेवून नैतिक तटस्थता पाळली गेली पाहिजे तसेच संशोधन अहवाल कसा तयार करावा याचेही सखोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार मार्गदर्शन करतांना म्हणाले की,संशोधन ही वैविध्यपूर्ण प्रक्रिया असून त्याला अनेक आयाम आहेत तसेच संशोधन ही काळाची गरज असल्यामुळे प्रत्येक योग्य व प्रतिभावंत माणसाने जीवनात एकदा तरी संशोधन केले पाहिजे.त्याचबरोबर कुठलेही कार्य फक्त स्वहितासाठी न करता समाजहिताचा दृष्टिकोन केंद्रबिंदू ठेवून केला पाहिजे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.गणेश जाधव यांनी केले तर आभार प्रा.ए.पी पाटील यांनी मानले.यावेळी प्रा.डॉ.हेमंत भंगाळे,प्रा.डॉ.एस.पी कापडे,प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा,संजय पाटील,संजीव कदम,मनोज पाटील,डॉ.संतोष जाधव,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.सि.टी वसावे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेकरिता मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.