आता दुध प्या बिनधास्त;लंम्पि रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही;पशु तज्ञांचे मत
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-संपूर्ण महाराष्ट्रात लंम्पि स्किन आजाराने अक्षरशः थैमान घातले असुन पशुपालक कमालीचा चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे.यात अनेक पशुपालक व शेतकऱ्यांचे पशुधन या आजाराला बळी पडलेले आहेत.त्यामुळे पशुपालकांना मोठया प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे.पाळीव जनावरांमध्ये लंम्पि त्वचा रोग वाढत चालल्याने गायी-म्हशीचे दुध प्यायचे किंवा नाही याबाबत सगळीकडेच संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे.या संभ्रमावर पशुवैद्यक तज्ञांनी आपले मत मांडले आहे,यात घरी आलेले दूध उकळून प्यायल्यास या आजाराच्या फैलावाचा कोणताही धोका संभवत नसल्याबाबतचा निर्वाळा पशुवैद्यक तज्ञांनी दिला आहे.या लंम्पि आजाराबाबत लोकांनी कुठलाही बाऊ न बाळगता फक्त सावधगिरी महत्वाची असल्याचे पशु तज्ञांचे मत आहे.
काही ठिकाणी व शहरांमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी पॅक बंद पाश्चराइज्ड दुधाचा पुरवठा केला जातो.सदरील दूध योग्य व उच्च तापमानात तापविले जाते त्यामुळे त्या दुधात विषाणू असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.एखाद्या तबेल्यातून येणारे दुधही घरी मोठ्या प्रमाणात उकळून पिल्यास त्यातून कोणताही धोका संभवत नाही.हा आजार जनावरांमधून संक्रमित झालेला नाही किंवा तसे कुठे आढळून आलेले नाही.त्यामुळे मानवामध्ये संक्रमणाचा कुठलाही धोका नसल्याचे मत डॉ.राजीव गायकवाड,औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख,पशुवैद्यकीय महाविद्यालय,मुंबई यांनी व्यक्त केले आहे.यात लंम्पि आजाराचा विषाणू दुधात टिकाव धरत नसल्यामुळे दुधापासून कोणताही धोका नसल्याबाबत पशुसंवर्धन विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.तसेच लंम्पिग्रस्त जनावरांचे दूध काढतांना हातमोजे व मास्क वापरणे गरजेचे आहे.अशा जनावरांचे दूध उकळून पिणे अधीक चांगले आहे.दुधाला गरम करून सेवन केल्यास त्याचे आणखी गुणधर्म वाढतात त्यामुळे दूध जास्त उकळून घ्यावे तसेच हळद टाकून पिल्यास अधिक उत्तम राहील असे पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त सहायक आयुक्त डॉ.व्यंकटराव घोरपडे यांनी सांगितले आहे.