गोपाल शर्मा,पोलीस नायक
अमरावती जिल्हा प्रतिनिधी :-
अमरावती जिल्ह्याचे खासदार सौ.नवनीत रवी राणा व बडनेरा आमदार रवीभाऊ राणा यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांकरिता भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च स्थान असलेल्या संसद भवन दर्शनाचा जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अभिनव उपक्रम नुकताच राबविण्यात आला.दोन दिवसांचा हा छोटेखानी उपक्रम पूर्ण करून सदरील विद्यार्थी स्वगृही नुकतेच परतले आहेत.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व राजकीय प्रगल्भता यावी तसेच त्यांना आपल्या देशाच्या सांसदीय कार्यप्रणालीचा अनुभव घेता यावा या संकल्पनेतून खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सदरील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन खूप काही शिकायला मिळाले असल्याचे प्रतिपादन खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यानिमित्त केले आहे.भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च स्थान असलेल्या संसद भवनात प्रवेश करताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.संसद भवनात आपल्याला प्रवेश मिळणे हे आपले अहोभाग्य असून हा अविस्मरणीय क्षण केवळ खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्यामुळे एवढ्या कमी वयात आम्हाला अनुभवता आला अश्या भावना या गुणवंत विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.यानिमित्त खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी या विद्यार्थ्यांना संसद भवन,लोकसभा,राज्यसभा ही सभागृहे,विविध मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची दालने,मध्यवर्ती सभागृह,वाचनालय,संसद भवन कॅन्टीन,आदी ठिकाणे दाखवून या सर्व विद्यार्थ्यांना घेवून स्नेहभोजन केले.या पिढीच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे नाव उज्वल व्हावे व संस्कारक्षम,सुजाण नागरिक निर्माण होण्यासाठी हा दिल्ली दौरा आयोजित केल्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी म्हटले आहे.