Just another WordPress site

यावल येथे उद्या ६ एप्रिल रोजी श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवानिमित्ताने बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

हिन्दु मुस्लीम बांधवांच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या व सुमारे एकशे विस वर्षांची परंपरेचा इतिहास लाभलेला येथील बालाजी महाराजांचा रथोत्सव यात्रा उद्या दि.६ एप्रिल २३ गुरूवार रोजी साजरी करण्यात येत आहे.यानिमित्ताने शहरात घरोघरी पाहुण्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळत असून रथोत्सवानिमित्त येथील शहराला लागून असलेल्या हरीता नदीपात्रात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने खंडेराव महाराजांच्या बारागाडया ओढण्याची जुनी प्रथा व परंपरा आहे परिणामी येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

सुमारे १९०५ सालामध्ये यावल शहरात हळपे महाराज यांनी रथोत्सवाला सुरुवात केल्याची आख्यायिका आहे.नंतरच्या काळात म्हणजेच १९१४ सालामध्ये या बालाजी रथोत्सवाची जबाबदारी पांडूरंग धोडू देशमुख यांचेकडे देण्यात आली.१९५७ मधे रथोत्सवाचे विश्वस्त मंडळ स्थापन करुन भाविकांकडून आलेल्या देणगीवर हा उत्सव आज अखेरपर्यंत साजरा केला जात आहे.१९१४ पासून ते आजपर्यंत पांडूरंग देशमुख यांचे घराण्यातच या उत्सवाचे प्रमुखत्व आहे.सद्या माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत.सुमारे ११७ वर्षापुर्वी १९०५ मध्ये रामजी मिस्त्री यांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या नक्षीदार कोरीव रथाचे १९७७ मध्ये रामजी मिस्त्रीच्या मुलांमार्फत पुनर्नुतनिकरण करण्यात आले.संपूर्ण सागवानी लाकडाचा कोरीव नक्षीदार काम असलेला रथ उत्कृष्ट कामगिरीचा अप्रतिम नमुना आहे.या रथाची उंची २२ फूट असून रथाचे १८ टन आहे त्याची चारही चाके बाभूळ या लाकडाची आहेत.रथावर बालाजी महाराजांची मूर्ती असते याशिवाय दोन अश्व, त्यांना हाकणारा सारथी,दोन्ही बाजूला दोन देवतांच्या मूर्त्या आहेत.रथाच्या उंच मनोऱ्यावर हनुमानाची मूर्ति आरूढ आहे.

महर्षी व्यास मंदिराजवळ उद्या दि.०६ रोजी विश्वस्त समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांच्या हस्ते रथाची पारंपारीक पद्धतीने विधिवत पूजा होईल त्यानंतर सायंकाळी हरीता नदीपात्रात खंडेराव महाराजांच्या बारागाडया ओढून झाल्यावर बालाजी महाराजांचा रथ शहरातील मुख्य रस्त्यावर मार्गक्रमण करीत काढण्यात येणार असून पहाटपर्यंत ही रथयात्रा सुरूच राहणार आहे.भाविकांच्या मदतीने शहरात ओढला जाणारा रथ मुख्य रस्त्यावर येतांना त्याच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम रथाच्या चाकांना मोगरी लावणारा करतो.ही मोगरी लावण्याची परंपरा रामजी मिस्त्री यांच्या वंशजानंतर गंगाधर दांडेकर,बाबूराव सोनार,हरी मिस्त्री,अशोक लोहार यांचे सह सुतार,लोहार घराण्यातील परंपरा आहे.सध्या दिलीप मिस्त्री,अशोक मिस्त्री,किशोर दांडेकर हे समर्थपणे सांभाळत आहेत.बालाजी महाराजांचा रथ शहराच्या मुख्य रस्त्यावर आला असल्याची सूचना दर्शनार्थी भाविकांना देणारे विशेष पारंपारीक वेशात असलेले भालदार व चोपदार गल्लीबोळात फिरुन भाविकांना बालाजी दर्शनासाठी आले आहेत आरती घेऊन चला अशी हाक देत ते फिरत असतात ही जबाबदारी शिवाजी चौधरी,राजू देशमुख,सुरेश वराडे हि मंडळी पार पाडत आहेत पूर्वी ही जबाबदारी  ज्योतीबा कदम पार पाडीत असत.

रथावर आरूढ बालाजी महाराजांना आरती दाखविणे,भाविकांच्या आरीतीच्या ताटात प्रसाद देणे आदी पौराहित्य काशीनाथ बयाणी यांचे नंतर १९४० ते १९७३ दरम्यान वासुदेव बाबा बयाणी,राजाभाऊ नागराज यांनी केले.काही वर्ष भैय्याजी अग्निहोत्री यांनी काम पाहीले.१९७३ नंतर रमेश शास्त्री बयाणी,नारायण बयाणी,बळवंत जोशी यांनी जबाबदारी पार पाडली.२००६ पासून महेश बयाणी,विनोद बयाणी,संजय बयाणी, सुनिल जोशी हे जबाबदारी पार पाडत आहेत.रथ नदीवर धुवायला नेणे,त्याची रंगरंगोटी,तेलपाणी,फुलांच्या माळांनी,विदयुत रोषणाईने सजविण्याचे काम सुरवातीपासून बरडीवरील रहिवासी लोकांकडे आहे यात भागवत पवार,गोविंदा खैरे,माधव वराडे,भागवत ढाके हे प्रमुख आहेत.सायंकाळी मार्गक्रमण करणारा रथ रात्रभर शहराच्या मुख्य रस्त्यावरून फिरुन पहाटे रेणूका देवीचे मंदिराजवळ आपल्या नियोजित स्थळी परततो.परिसरातील शेकडो नागरीकांच्या उपस्थित साजरा होणाऱ्या श्री बालाजी रथोत्सवाच्या मिरवणुकीसाठी विभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे,पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे,पोलीस उप निरिक्षक सुनिल मोरे,पोलीय उपनिरिक्षक सुनिता कोळपकर,राखील पोलीस दलाचे पोलीस उपनिरिक्षक प्रविण उमाळकर यांच्यासह पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.