Just another WordPress site

शिंदे- फडणवीस यांनी भविष्यात मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको !

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची घणाघाती टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता फॉक्सकॉनचा दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हि फार गंभीर बाब असुन महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालत आहे हे यातून स्पष्ट झालेले आहे.परिणामी मोदी-शहा यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणे म्हणजे हि महाराष्ट्राशी बेईमानी आहे,अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात राज्यात गुंतवणूक आणण्याकरिता आघाडी सरकारने फॉक्सकॉन अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती व हा प्रकल्प महाराष्ट्रात प्रस्तावित करण्याबाबत जवळजवळ निश्चितता करण्यात आलेली होती.याबाबत आघाडी सरकार व वेदांता फॉक्सकॉन यांच्यात अंतिम टप्प्यापर्यंतच्या वाटाघाटीही झालेल्या होत्या.या प्रकल्पास गुजरातमधील जागेपेक्षा पुण्याजवळील तळेगाव येथील जागा जास्त फायदेशीर होती.आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी चांगले पॅकेज दिले होते.मात्र राज्यात सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातमध्ये पाठविण्यात आला हि फार मोठी गंभीर बाब आहे.हा प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता तर राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांना  रोजगार मिळाला असता त्याचबरोबर रोजगारासोबत त्या भागात छोट्या मोठया उद्योगाची साखळी निर्माण होऊन यातून राज्याला मोठा आर्थिक फायदा झाला असता.पण महाराष्ट्रातील हा मोठा प्रकल्प गुजरामध्ये जाईपर्यंत ईडी सरकारने झोपा काढल्या व प्रकल्प गुजरातमध्ये गेला हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ताकाळात २०१४-१९ मध्ये मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय वित्त सेंटर,हिरे व्यापार व डॉकयार्ड हे गुजरातला गेले व आता पुन्हा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला.हे भाजपाचे षडयंत्र पहाता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात मुंबई गुजरातला दिली तर त्यात आश्चर्य वाटायला नको.अशी जोरदार टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.