“आमचे सगळे सहकारी एका विचाराने…..दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही”
शरद पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत सर्व राजकीय चर्चांच्या प्रकरणावर टाकला पडदा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चांगलेच उधाण आले आहे याबाबत वेगवेगळे दावे वेगवेगळ्या पक्षांकडून केले जात आहेत.खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही अजित पवारांचा निर्णय मान्य असेल अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्यामुळे या सगळ्या चर्चेत तेल ओतले गेले आहे या पार्श्वभूमीवर अखेर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व चर्चांवर मौन सोडले असून आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की,सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे ती आमच्या कुणाच्याही मनात नाही त्यामुळे या चर्चेला अजिबात महत्त्व देऊ नये.कुणीतरी बातम्या तयार करण्याचे काम करीत असून त्याला काहीही अर्थ नाही.”राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसे करायचे या भूमिकेत आहेत त्यामुळे त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही”असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षाचे प्रांताध्यक्ष हे सध्या मार्केट कमिट्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आहेत तसेच अजित पवारही याच कामात आहेत.मी माझे ठरलेले कार्यक्रम पूर्ण करतोय त्यामुळे मी स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्यात कुणालाही फाटे फोडण्याचा अधिकार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.अजित पवार यांच्याकडे ४० आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्यांचे पत्र असल्याचा दावा ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रातील वृत्तामध्ये करण्यात आला होता त्यावरून अजित पवारांविषयी अनेक दावे-प्रतिदाव्यांना ऊत आला आहे यासंदर्भात राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी अजित पवार जो निर्णय घेतील,तो आम्हाला मान्य असेल अशी जाहीर भूमिका घेतली तर काही आमदारांनी असे काहीही नसून आम्ही कुठेही सह्या केलेल्या नाहीत असे म्हटले आहे त्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतांना आता शरद पवारांनी त्यावर स्पष्टपणे भूमिका मांडत सर्व राजकीय चर्चांच्या प्रकरणावर पडदा टाकला आहे.