“सगळ्यात मोठी उलथापालथ भाजपा मध्येच ” सध्याच्या राजकीय चर्चांवर सामनातून भाष्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
भाजपासाठी शिंदे गट हे आता बिनकामाचे ओझे ठरत असल्यामुळे हे ओझे कसे फेकता येईल यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरु आहे. आश्चर्य असे की कालचे बाहुबली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील या सगळ्या उपक्रमात पूर्ण बेपत्ता असून त्यामुळे सगळ्यात मोठी उलथापालथ ही भाजप अंतर्गत सुरु आहे की काय?अशी शंका घ्यायला जागा आहे असे म्हणत सामनातून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देण्यात आली आहे.
अजित पवार हे नाराज असून लवकरच ते राष्ट्रवादीला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षाच्या तंबूत सहभागी होतील व मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील अशा वावड्या उठवल्याने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार,सगळे वातावरण ढवळून निघणार वगैरे चर्चांना उधाण आले आहे परंतु असे प्रत्यक्ष उधाण कुठे दिसेल तर शपथ!!अजित पवार यांनी मुंबईत आमदारांची तातडीची बैठक बोलावली असून ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र त्यांच्या हाती फडफडत असल्याचे वृत्त माध्यमांवर गेल्या चार दिवसांपासून तडतडत आहे परंतु अजित पवार यांनी स्वतः देखील आता साफ इन्कार केला आहे असे सामनातून म्हटले आहे.मात्र भाजपसाठी शिंदे गट हे आता बिनकामाचे ओझे ठरल्याने हे ओझे कसे फेकता येईल? यावर दिल्ली व महाराष्ट्रात कार्य सुरु आहे व आश्चर्य असे की कालचे बाहुबली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील या सगळ्या उपक्रमात पूर्ण बेपत्ता असल्यामुळे सगळ्यात मोठी उलथापालथ ही भाजप अंतर्गत सुरु आहे की काय?अशी शंकाही सामनातून उपस्थित करण्यात आली आहे.भाजपकडे स्वतःचे असे काहीच नाही,दुसऱ्या पक्षातील लोक उधार घेऊन ते स्वताचा पक्ष चालवीत आहेत.कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वतःचे घर भरायचे,काँग्रेसवरही त्यांची वाईट नजर आहेच.धमक्या,दबाव व तपास यंत्रणाची सुरामारीमुळे महाराष्ट्रासह देशात लोकशाही तसेच कायद्याचे राज्यच संपवून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच अजित पवारांच्या बाबतीत वावड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम त्यांनीच केले असून महाराष्ट्राला अस्थिर,बदनाम व गोधळ निर्माण करण्याचे कारस्थान केले जात आहे असे सामनातून सध्याच्या राजकीय चर्चांवर भाष्य करण्यात आले आहे.