मिरज शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये मुर्तीची विटंबना केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीसांनी संशयित मनोरूग्ण महिलेला ताब्यात घेतले आहे.दरम्यान या प्रकारामुळे शहरातील दुकाने काल दुपारपासून बंद ठेवण्यात आली असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे.लक्ष्मी मार्केटमध्ये महापालिकेच्या अग्निशमन कार्यालयाच्यामागे पूरातन हनुमान मंदिर असून या मंदिरातील मुर्तीची विटंबना केल्याचा प्रकार काही लोकांच्या नजरेस आला.सदरील माहिती तात्काळ शहरात पसरल्यानंतर हिंदूत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले व जय श्रीरामच्या घोषणा देत लक्ष्मी मार्केट परिसरात फेरी मारली यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने दुपारपासून बंद करण्यात आली तसेच उपहारगृहे,चहा गाडे,ईदनिमित्त पदपथावर विक्रीसाठी बसलेले विक्रेते,भाजीपाला विक्रेते यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले.शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ मिरज शहरासह,महात्मा गांधी चौक,औद्योगिक वसाहत,सांगली ग्रामीण,विश्रामबाग,सांगली शहर,मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यासह मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.दरम्यानच्या काळात पोलीसांनी या घटनेची सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला असता सदरचे कृत्य एका महिलेने केल्याचे समोर आले असून त्याच्या आधारे सदर महिलेला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान शहरात सुमारे चार तास तणाव निर्माण झाला होता.यावेळी हिंदूत्ववादी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जमून घोषणा देत होते.पोलीसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले असल्याचे सांगितल्याने निर्माण झालेला तणाव निवळला असला तरी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.यावेळी उपअधिक्षक अजित टिके,शहर निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी मुख्य मार्गावर पथसंचलनही केले.प्रसंगी पोलीेस अधिक्षिक बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन परीस्थिती नियंत्रणात असल्याचे व संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे सांगितले आहे त्यामुळे कोणत्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.