“तेल्हारा नगर परिषद सुस्त,कर्मचारी मस्त व जनता त्रस्त” नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हट्यावर
मोकाट प्राण्यांमुळे नागरिक त्रस्त तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गोपाल शर्मा ,पोलीस नायक
अकोला जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यातील तेल्हारा नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षीत व भोंगळ कारभारामुळे तसेच मोकाट कुत्रे,गाढव व डुकरांचा सर्वत्र मुक्त संचार वाढलाने ही एक नागरिकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे तसेच गटारी व नाल्यांची नियमित साफसफाई केली जात नसल्यामुळे नाल्यांमध्ये घाण कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला असून दिवसेंदिवस मच्छरांचे प्रमाण वाढत असल्याने नागरीकांचे व त्यांच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तरी याबाबत जिल्हाधिकारी व नगरपरिषद प्रशासक यांनी नागरिकांच्या आरोग्याची गांभीर्याने दखल घेवुन तात्काळ प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी तेल्हारा शहरातील नागरिकांकडुन करण्यात आली आहे.
तेल्हारा नगर परिषदच्या विस्तारित वसाहतीच्या कार्यक्षेत्रासह शहरातील विविध ठिकाणी मागील अनेक दिवसांपासुन मोकाट फिरणारी कुत्रे,गाढव व डुकरांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढल्याने शहरातील नागरीकांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करून नागरीकांचे मोठे आर्थिक नुकसान करणे व रात्रीच्यावेळी मोकाट कुत्र्यांच्या मुक्त संचारातून दुचाकीस्वारांच्या मागे लागुन त्यांची त्रेधारिपीट उडवीणे असे प्रकार शहरात त्याचबरोबर गाढवांची व डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे डासांचा उपद्रव सातत्याने वाढत आहेत त्यामुळे सद्या तेल्हारा शहरात वेगवेगळया आजारांची साथ सर्वत्र पसलेली दिसुन येत आहे.नगर परिषदच्या आरोग्य विभागाकडुन या नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत कोणत्याही संदर्भात गांर्भीयाने दखल घेतली जात नसल्याने प्रशासकीय कारभाराबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून “स्वच्छ भारत अभियानाचे”तीन तेरा वाजविण्यात आले आहे.एकीकडे महाराष्ट्र व केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबविण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करीत असून येथील नगरपरिषद स्वच्छता अभियानाला हरताळ फासत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तसेच दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदमध्ये येण्याजाण्या करिता रेलिंग नसल्यामुळे त्यांना चढउतरकरतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.जर दिव्यांग व्यक्तींना चढता उतरताना काही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची ? का दिव्यांग व्यक्तीचा अपघात होण्याची वाट नगरपरिषद पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल स्थानिक दिव्यांग व्यक्ती करत आहे.एकीकडे दिवसेंदिवस तेल्हारा शहरांमध्ये मच्छरांचा हौदोस माजलेला आहे तर दुसरीकडे मच्छर धूर फवारणी यंत्र नगर परिषदमध्ये धूळ चाटत पडलेले आहे.तसेच तेल्हारा नगर परिषदेच्या इमारतीवरील कार्यालयाला नावाचा देखील विसर पडलेला असून तेथील नावाची दुरुस्ती करणे आज गरजेचे आहे.एकीकडे नगरपरिषदच्या कार्यालयालाजवळ स्वच्छता अभियानाचे जाहिरातीचे फलक लावलेले आहे आणि त्याच नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरात आजूबाजूला काटेरी झाडे व गाजर गवत वाढल्यामुळे अस्वच्छता पसरलेली आहे.तरी जिल्हाधिकारी साहेबांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी करावी व कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून कायमस्वरूपी निलंबित करावे अशी मागणी शहरामध्ये जोर धरत आहे तसेच याबाबत जिल्हाधिकारी व प्रशासक यांनी तात्काळ नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत मोकाट फिरणारे धोकादायक कुत्रे व डुकरांची वाढलेली संख्या आटोक्यात आणण्याकरिता प्रभावी उपाययोजना करण्यात यावी तसेच शहरात मोठया प्रमाणात वाढलेल्या डासांचा उपद्रव थांबविण्यासाठी युध्द पातळीवर औषधींची फवारणी करण्यात यावी अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.