जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-वाहन चालक परवाना मिळविण्याकरिता कर्णबधिर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(जीएमसी)सुरु करण्यात आली आहे. या तपासणीत दिव्यांग व्यक्ती पात्र ठरल्यानंतर त्यांना परिवहन विभागाशी (आरटीओ) संबंधित पुढील प्रक्रिया पार पडणे सोईचे होणार आहे.आता शासन निर्णयानुसार कानाचे मशीन लावून केलेल्या तपासणीत अपेक्षित निकषांवर दिव्यांग व्यक्ती पात्र ठरल्यास त्याला वाहन चालक परवाना मिळणार आहे.याबाबतची नोंदणी जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(जीएमसी)सुरु करण्यात आली आहे.जीएमसीच्या बाह्य रुग्ण विभागातील खोली क्र.२०२,पहिला मजला येथे सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत हि तपासणी केली जाणार आहे.त्याकरिता कान,नाक व घसा विभागात पूर्व नोंदणी करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात २३ शासकीय वैद्यक महाविद्यालय असून आतापर्यंत फक्त मुंबई,पुणे व नागपूर या तीन ठिकाणच्या वैद्यक महाविद्यालयातच बेरा श्रवण तपासणी केली जात होती.आता या निवडक ठिकाणांमध्ये जळगाव जीएमसीचा समावेश करण्यात आला आहे.खान्देशातील जळगाव,धुळे व नंदुरबार या तीन जिल्हांपैकी केवळ जळगावमध्ये या प्रकारची तपासणी सुरु झालेली असल्याने कर्णबधिर दिव्यांगांना याचा फायदा होणार आहे.याबाबतची दिव्यांग प्रमाणपत्र व वैद्यकीय सुविधा मिळण्याकरिता ऑडिओमेट्री व बेरा श्रवण तपासणी सुविधा रुग्णालयात सुरु झाल्याने कर्णबधिर दिव्यांगांची गैरसोय दूर होणार आहे,अशी माहिती जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(जीएमसी) अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.