बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या भेंडवळ गावात प्राचीन घटमांडणी परंपरा जोपासली जाते.या घटमांडणीचे अंदाज दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले असून त्यानुसार अवकाळी पाऊस,अतिवृष्टीचा इशारा या घटमांडणीतून देण्यात आला आहे.सदरील घटमांडणीच्या या अंदाजावरून शेतकरी आपले पिक-पाण्याचे नियोजन करत असतात मात्र या भेंडवळीच्या अंदाजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संघटक रघुनाथ कौलकार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हे आवाहन केले आहे. भेंडवळीच्या घटमांडणीत केलेले अंदाज निव्वळ अशास्त्रीय पद्धतीने काढलेले असतात याला कोणतेही शास्त्रीय आधार नाहीत.निव्वळ पोपटपंची म्हणून ही भाकित सांगितली जातात असे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संघटक रघुनाथ कौलकर यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की,अंधश्रद्धा निर्मुलन समिती गेली २५ वर्षे सुक्ष्मपणे या घटमांडणीचा अभ्यास करत आहे यात कितीतरी भाकित खोटी ठरतात.लॉ प्रोबॅबलिटीनुसार ५० टक्के भाकित खरी होतात आणि त्याचा उदोउदो केला जातो.जी भाकित खोटी ठरतात त्याचा कोणीही विचार करत नाही त्यामुळे अशा निराधार भाकितांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे रघुनाथ कौलकार यांनी म्हटले आहे.
शनिवार २२ एप्रिल रात्रीपासून मुक्कामी असलेल्या हजारो शेतकरी,कृषी व्यावसायिक व ग्रामस्थांच्या साक्षीने पुंजाजी महाराज यांनी पीक, पाऊस व राजकीय विषयक भाकीत (नित्कर्ष) जाहीर केले त्यानुसार कापूस पीक सर्व साधारण (उत्पादन),ज्वारी पीक चांगले राहणार असून त्याला भावही चांगला राहील.तूर,मूग,उडीद ही पिके ‘मोघम’ राहणार असून उत्पादन मध्यम स्वरुपाचे राहील.तीळ पिकाची नासाडी होणार असून बाजरी पीक साधारण राहील.तांदूळ पीक चांगले ( समाधानकारक उत्पादन) राहणार असून भावात तेजी राहील.मठ,जवस पीक साधारण राहणार असून नासाडी होण्याची चिन्हे आहे.लाख पीक साधारण राहणार असले तरी भावात तेजी राहील.गहू,वाटाणा ही पिके चांगली राहणार.जास्त उत्पादन होऊन भावपण चांगला राहील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.पर्जन्यमानाबद्दल पुंजाजी महाराजांनी वर्तविलेली भाकिते लाखो शेतकऱ्यांना चिंतेत पाडणारी ठरली आहे यात खरीपसाठी महत्त्वाच्या जूनमध्ये कमी,जुलैमध्ये साधारण पाऊस राहील ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला.अवकाळी पाऊस पुढे पण सतावणार असे भाकीत सांगण्यात आले आहे.
दरम्यान पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या राजकीय-सामाजिक भाकिताबाबत व्यापक उत्सुकता होती. घटमांडणीमधील ‘गादी’ हलली नसली तरी त्यावर माती आली आहे त्यामुळे ‘राजा कायम’ राहील पण त्याला बराच संघर्ष करावा लागेल असे भाकीत आहे.संरक्षण खाते (यंत्रणा) मजबूत राहील मात्र भारताला परकीय देशाचा त्रास राहील असा नित्कर्ष आहे.देशाची आर्थिक परिस्थितीदेखील साधारण राहील असा अंदाज आहे.भेंडवळ घटमांडणीची परंपरा सुमारे ३७० वर्षांपासून दरवर्षी विश्वासाने जपली जात आहे. चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला.आता पुंजाजी महाराज वाघ व सारंगधर महाराज हे घटाची पाहणी करून भाकीत व्यक्त करतात.रामचंद्र वाघ यांनी सुमारे १६५० साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला.पुढे पाऊस,पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घटमांडणी सुरू केली असे सांगण्यात येते.घटमांडणी अक्षय्य तृतीयेला होते व त्यातील बदलावरून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी अंदाज सांगण्यात येतो.