सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करताना खारघर येथे रणरणत्या उन्हात झालेल्या सोहळ्याप्रसंगी उष्माघाताने १३ श्री साधकांचा चेंगराचेंगरीत हकनाक बळी गेला.पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दुपारच्या तळपत्या उन्हात २० लाख श्री साधकांची गर्दी गोळा करायची नव्हती परंतु केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ही गर्दी गोळा केली.श्री साधकांच्या मृत्युकांडाला सर्वस्वी शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे.शिंदे-फडणवीस दोघेही या दुर्घटनेबद्दल अवाक्षरही काढत नसून यात त्यांना लाज कशी वाटत नाही असा संतापजनक सवाल काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे. खारघर दुर्घटना ही संपूर्णतः निसर्गनिर्मित नाही तर सरकारनिर्मित आहे असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.यासंदर्भात दोनदिवसीय विधिमंडळ विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर स्वतःचा राजकीय प्रभाव वाढविण्याच्या हेतूने केवळ राजकीय स्वार्थापोटी शिंदे-फडणवीस सरकारने खारघर येथे भर दुपारच्या तळपत्या उन्हात महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला.खरे तर हा सोहळा पूर्वीच्या पध्दतीने एखाद्या बंदिस्त सभागृहात आयोजित करणे गरजेचे होते परंतु केवळ निरूपणकार धर्माधिकारी यांच्या लाखो श्री साधकांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन घडविण्याचाच उद्देश सरकारने डोळ्यासमोर ठेवला होता नंतर ही दुर्घटना अंगलट येऊ नये म्हणून आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संस्थेलाच दोष देण्याचा खेळ सुरू आहे.धर्माधिकारी यांच्याविषयी समस्त महाराष्ट्राला आदर वाटतो परंतु त्यांच्या आडून राजकीय पोळी भाजून घेण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील,शहराध्यक्ष चेतन नरोटे,शहर कार्याध्यक्ष माजी महापौर संजय हेमगड्डी,अलका राठोड,मनीष गडदे आदी उपस्थित होते.