मुख्यमंत्री तीन दिवस रजेवरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचे “मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर” असल्याचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसापासून रजेवर असल्याची जोरदार चर्चा काल राजकीय वर्तुळात रंगू लागली होती यावरून महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्य केले होते.दरम्यान याबाबत आता स्वत: मुख्यमंत्र्यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिले असून मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर असल्याचे साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.मी आता सातारा दौऱ्यावर असून इथे येऊन मी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली व तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजनही केले तसेच महाबळेश्वर येथील पर्यटनाच्या दृष्टीने आढावा बैठकही घेतली त्यामुळे मी सुट्टीवर आहे हे खरे नसून खरे तर मी डबल ड्युटीवर असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,विरोधक माझ्यावर आरोप करतात कारण त्यांच्याकडे काहीही कामे शिल्कल राहिलेली नाही त्यांना आरोप केल्याशिवाय दुसरे कोणतेही काम नसून आम्ही त्यांना घरी बसवले आहे त्यामुळे ते आरोप करतीलच. मात्र आम्ही त्यांना आरोपाचे उत्तर आरोपाने नाही तर कामाने देऊ असे ते म्हणाले.तसेच मी साताऱ्यात येऊन आराम केलेला नाही तर साताऱ्यात आल्यानंतर अनेक जण भेटायला आले.येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यावर माझा भर आहे त्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत असेही त्यांनी नमूद केले.दरम्यान मुख्यमंत्री रजेवर असल्याच्या चर्चेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या टोला लगावला होता.मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्या गावात महापुजेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे.माणूस संकट काळात पुजा अर्चना करत असतो.आता त्यांच्यासाठी जरा संकटाचा काळ आहे.मागे त्यांनी शिर्डी आणि कामाख्याला जाऊनही पुजा केली होती असे सुषमा अंधारे यांनी नुकतेच म्हटले होते.