यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत दि.२५ एप्रील रोजी हिवताप दिनानिमिताने हिवताप मोहीम राबविण्यात आली.यावेळी प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन,उपवैद्यकीय अधिकारी तरन्नुम शेख व तालुका पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव अंतर्गत उपकेंद्र आडगाव येथे हिवताप मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत गावात जलताप रुग्ण सर्वेक्षण,कंटेनर सर्वेक्षण,हस्त पत्रिका वाटणे अशा प्रकारे आरोग्य संदर्भातील जनजागृती मोहीम राबविण्यात आली.तसेच यामध्ये गाव पातळीवर हिवतापाची लक्षणे,उपचार व हिवताप प्रतिरोधक उपाययोजनांनबद्दलची माहिती नागरिकांना देण्यात आली.तरी नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे,घरासमोरील नाल्या वाहत्या करणे,खिडक्यांना जाड्या बसवणे,शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाडी बसवणे,घरासमोर पाणी साचू न देणे,आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाडणे अशा सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आल्या.या मोहिमेमध्ये आडगावचे सरपंच,सदस्य,शिक्षक,आरोग्य सेवक व आरोग्य सेविका इतर नागरीक यावेळी उपस्थित होते.तसेच मनापुरी गावामध्येही आरोग्य सेविका शिला पावरा यांनी ग्रामस्थांना हिवतापाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.तर किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राअंतर्गत येणाऱ्या मालोद,नायगाव,चिंचोली उपकेंद्रासह किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात आली.यामध्ये आरोग्य सहाय्यीका श्रीमती उषा पाटील,कविता सपकाळे,आरोग्य सहाय्यक राजेश सुरवाडे,आरोग्यसेविका मोहिनी धांडे,सुजाता सोनवणे व आशा वर्कर यांनी सहभाग नोंदविला.