वर्धा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
एक मे रोजी निकाल लागणार व त्यानंतर शाळांना सुट्टी लागणार अशी शासनाच्या वतीने नुकतीच घोषणा करण्यात आलेली होती.परंतु आता हि सुट्टी लागण्याची मुदत ६ मे पर्यत वाढविण्यात आली असल्याने मामाच्या गावाला जाण्याच्या तयारीत असलेल्या बालगोपाळांचा थोडा भ्रमनिरास होणार आहे.प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या सुट्यांच्या तारखांमध्ये बदल केला असल्यामुळे सदरील सुट्या ह्या १ मे ऐवजी ६ मे पासून लागणार आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की,एक मे रोजी महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा करायचा असून ६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचा सांगता समारंभ या दिवशी घ्यायचा आहे.या सांगता समारोहादरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आलेल्या आहेत.तसेच या नंतर निकाल जाहीर करून गुणपत्रकांचे वाटप करण्यात यावे व त्यानंतर उन्हाळी सुटी सुरु होणार आहे असे पत्रकात सांगण्यात आले आहे.प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या शालेय कालावधी नेहमीप्रमाणेच राहणार आहेत.महाराष्ट्र दिन व स्मृती सोहळा या पार्श्वभूमीवर हा बदल वेळेवर करण्यात आला असून उन्हाळी सुट्या या ६ मे पासून लागणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.