मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भाजप आणि शिंदे सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात आलेली वज्रमूठ सभा उद्या दि.१ मे २३ रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात महाराष्ट्रदिनी होणार आहे.सदरील सभा यशस्वी करण्याकरिता शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद पणाला लावली असून प्रत्येक पक्षाकडून दोन वक्ते असले तरी काँग्रेसकडून कोण बोलणार यांची अधिकृत नावे जाहीर करण्यात आलेली नसल्याने हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर नंतर तिसरी जाहीर सभा महाराष्ट्रदिनी सायंकाळी वांद्रे-कुर्ला संकुलात होणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ही सभा असल्याने ठाकरे गटाने ही सभा यशस्वी करण्याकरिता जास्तीत जास्त गर्दी कशी होईल यासाठी लक्ष दिले आहे.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही जास्तीत जास्त लोक जमा करण्यावर जोर दिला असून नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरपेक्षा मुंबईतील सभा अधिक मोठी करण्याचा तिन्ही पक्षांचा निर्धार आहे.राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करावे असा ठाकरे गटाचा प्रस्ताव होता परंतु शरद पवार हे राज्यपातळीवरील मेळाव्यांना उपस्थित राहणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.
या सभेदरम्यान प्रत्येक पक्षाकडून दोनच वक्त्यांनी भाषणे करावीत असा निर्णय घेण्यात आला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख भाषण राहणार आहे.नागपूरच्या सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपस्थित असूनही पक्षाने जयंत पाटील व अनिल देशमुख यांना संधी दिली होती तर यावेळी अजितदादांनी बोलण्याचे टाळल्याने त्याचे वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात आले होते.सोमवारच्या सभेत छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड यांना संधी दिली जाईल मात्र जर अजित पवार भाषण करणार असतील तर यापैकी एकच वक्ता असेल त्याचबरोबर काँग्रेस पक्षातर्फे मुंबईचे अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांना संधी दिली जाईल याशिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल असे सांगण्यात येत असून मुंबईत दोनऐवजी तिघांना प्रत्येक पक्षाने संधी द्यावी अशीही चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.