गोपाल शर्मा ,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-
तेल्हारा शहरात विविध ठिकाणी छुप्या मार्गाने अवैध गुटखा विक्री सुरू असून यामध्ये टॉवर चौक परिसर हा गुटखा विक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे.संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती असल्याने पोलिसांच्या आशीर्वादामुळे गुटखा माफियांच्या गुटखा विक्रीच्या अड्ड्यांची संख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतांना आजही लहान मोठ्या पान व चहाच्या टपऱ्या,लहान मोठ्या हॉटेल,किराणा दुकानांमध्ये छुप्या मार्गाने गुटखा विक्री जोरात सुरू आहे.याबाबत तेल्हारा पोलीस स्टेशन तसेच जिल्ह्यातील पोलीस काय झोपा काढत आहे? असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.गुटख्याच्या सर्रास विक्रीमुळे लहान तसेच तरुण मुले गुटख्याच्या व्यसनात व्यसनाधीन होत असून शहरात विविध ठिकाणी गुटख्यांच्या पुड्यांचा मोठा खच पडलेला दिसून येत असल्याने हा गुटखा पुड्यांचा खच काय आकाशातून पडतो का ? असा सवाल शहरवासियांमधून उपस्थित केला जात असून यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तसेच गुटखा माफियांशी तेल्हारा पोलिसांचे मधुर संबंध असल्यामुळे ” सैंया भए कोतवाल अब डर काहे का ” या उक्तीनुसार तेल्हारा पोलीस गुटखा माफियावर कोणतीही कारवाई करत नसल्याची तेल्हारा शहरात जोरदार चर्चा आहे.या बाबीकडे जिल्हा पोलीसअधीक्षक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे शहरवासियांमध्ये बोलले जात आहे.
तेल्हारा पोलिसांचे गुटखा माफियांशी मधुर संबंध असल्यामुळे तसेच तेल्हारा पोलीस गुटखा माफियांवर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे तेल्हारा शहरात मुख्य केंद्र टावर चौक,पोस्ट ऑफिस जवळ,संत तुकाराम चौक,माळेगाव नाका,शेगाव नाका,बस स्थानक परिसर,आठवडे बाजार परिसर येथे लपून छपून गुटख्याची सर्रास विक्री होत असून शहरातील व ग्रामीण भागातील शाळकरी लहान मुले,तरुण व युवा पिढी व्यसनाधीन होत आहे व त्यांचे भविष्यातील जीवनाचा सत्यनाश होत आहे व याकडे तेल्हारा पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने तेल्हारा पोलीस स्टेशनबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तसेच तेल्हारा पोलीस स्टेशनला हप्ते खोरीची लागण लागली आहे काय ?अशी संतप्त प्रतिक्रिया तेल्हारा शहरातून उमटत आहे.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक तेल्हारा पोलिसांवर कारवाई का करत नाही?जर गलेलठ्ठ पगार घेऊनही तेल्हारा पोलीस गुटखा माफियांवर कारवाई करत नाही तर अशा कामचूकार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित का केल्या जात नाही?यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.तसेच तेल्हारा शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा कसा येतो व त्याची विक्री कशी होत आहे याची जाणीव तेल्हारा पोलिसांना नाही का? सदरील गुटखा हा मध्यप्रदेशमधून चोरी छुप्या मार्गाने शहरात आणल्या जात आहे हा गुटख्यांचा पुरवठा आकाशातून खाली पडत आहे काय? किंवा तेल्हारा शहरात गुटखा विक्रीला परवानगी मिळाली आहे काय?असे प्रश्न तेल्हारा शहरवासियांमध्ये उपस्थित केले जात आहेत.तरी जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी लक्ष पुरवून तेल्हारा शहरात होणारी गुटखा विक्री थांबवावी अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात आली आहे.तरी तेल्हारा शहरातील गुटखा विक्रीचे प्रकरणावर कारवाई होते की प्रकरण दाबल्या जाते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.