मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी प्रशासनात मोठे फेरबदल करीत दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत.त्यानुसार नितीन करीर यांची वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी तर मिलिंद म्हैसकर यांची आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे.तसेच तुकाराम मुंढे यांना सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आले आहे.आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी झालेल्या वादंगानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक पदावरून हटविण्यात आलेल्या तुकाराम मुंढे यांची तब्बल सहा महिन्यानंतर आता पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.या विभागात काम करण्याच्या मुंढे यांच्या इच्छेला विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी होकार दिल्यानंतर निवृत्तीच्या उंबरठय़ावर असलेले जे.पी.गुप्ता यांची बदली करून तेथे मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे व मंत्री तानाजी सावंत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू होते.सावंत यांच्या नाराजीनंतर अवघ्या आठ महिन्यातच खंदारे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मिलिंद म्हैसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय दिनेश वाघमारे यांची गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी (अपिले),राधिका रस्तोगी यांची अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिवपदी,संजीव कुमार यांची महापारेषण कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.श्रावण हर्डीकर यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी,जी.श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तपदी तर अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात सह आयुक्तपदी व बी.शिवशंकर यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.आता महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदासाठी सुजाता सौनिक किंवा मनिषा म्हैसकर तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदासाठी असीम गुप्ता,सौरभ विजय आणि अनिल डिग्गीकर हे दावेदार मानले जात आहेत.म्हाडाच्या उपाध्यक्षपदी संजीव जयस्वाल यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.