रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर ‘केस पेपर’ काढावा लागतो व त्यावर रुग्णाने जात लिहिणे बंधनकारक असल्याचा धक्कादायक प्रकार येथील उपजिल्हा रुग्णालयात उघड झाला आहे.उपचारादरम्यान हा रकाना भरणे बंधनकारक असून तो भरण्यासाठी डॉक्टर रुग्णांची जात विचारतात असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय हे चांदवड,नांदगाव,येवला या तीनही तालुक्यांना मध्यवर्ती आहे.सदरील शहर व परिसरातील तसेच ४० खेडय़ांतील रुग्ण या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात.यात ‘केस पेपर’वर नऊ रकाने असून त्यात जातीचा एक आहे.रुग्णाला आपली जात सांगावी लागते त्यानंतरच उपचार केले जातात हा प्रकार फारच धक्कादायक असून यातून शासनाला काय साधायचे आहे?जात पाहून उपचार केले जाणार काय?असे प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांच्या वतीने उपस्थित करण्यात आले आहेत.सदरहू कोणत्याही रुग्णावर त्याची जात,धर्म,लिंग व वंश पाहून उपचार केले जाऊ नये असे घडत असेल तर ती सरळ सरळ भारतीय नागरिकांच्या समानतेच्या हक्काची पायमल्ली असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले आहे.जात ही एक अंधश्रद्धा असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाम मत असून शासनसुद्धा जाती पातीसाठी प्रयत्न करत आहे असे असताना रुग्णाला जात विचारणे हे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे परिणामी जातीचा रकाना हटविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करत असल्याचे समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले आहे.तर या प्रकरणाबाबत जातीपातीचा काही संबंध नसून बाह्यरुग्ण पत्रिकेचा विहित नमुना हा निश्चित करण्यात आलेला असून तोच संपूर्ण महाराष्ट्रात वापरण्यात येत आहे.या नमुन्यात जात रकान्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे हा नमुना भरून घेताना रुग्णाला जात विचारणे क्रमप्राप्त ठरते व उपचार करताना आम्ही जात पाहत नसून आमच्यासाठी आलेला प्रत्येक रुग्ण एकसमान आहे अशी प्रतिक्रिया डॉ.पवन राऊत,वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय,मनमाड यांनी दिली आहे.