कोल्हापूर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
हातकणंगले तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या ऐनवेळच्या विषयामध्ये थंड पेयांमध्ये कॅफिन वापरण्यात येणाऱ्या जाहिरातींवर व विक्रीवर बंदी ठराव नुकताच केला आहे.सदरील ग्रामपंचायत सरपंच,ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत यांनी घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यानिमित्ताने पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व दुकानदारांना नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे कि,दुकानांमध्ये विक्रीसाठी असणाऱ्या थंड पेयांमध्ये कॅफिन वापरलेले अनेक थंडपेय आहेत जसे की स्टिंग,फ्रेश एनर्जी ,चार्ज वगैरे अश्या प्रकारच्या अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत.गावामध्ये १८ वर्षाखालील लहान मुलांमध्ये अशाप्रकारचे थंड पेय पाण्याचे प्रमाण आढळून आलेले आहे.तरी अशा कॅफीनयुक्त थंड पेयापासून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.यासर्व गोष्टींचा विचार करून अशा पेयांपासून लहान मुलांच्या आरोग्यास निर्माण होणारा धोका व तरुणांच्या वाढणारी व्यसनाधीनता या गोष्टींना आळा घालण्यासाठी पारगाव ग्रामपंचायत ग्रामसभेच्या ऐनवेळीच्या विषयामध्ये अशा थंड पेयांच्या विक्रीवर बंदीचा ठराव करण्यात आला असून अशा प्रकारच्या कोणत्याही थंड पेयांची आपल्या गावामध्ये विक्री करू नये तसेच या प्रकारच्या थंडपेयाची जाहिरात आपल्या दुकानासमोर करू नये.तरी अशी कॅफीनयुक्त थंडपेय विक्री करतांना निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नोटिसीद्वारे दुकानदारांना कळविण्यात आलेले आहे.सदरील पारगाव ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे संपूर्ण महाराष्ट्रभरातुन कौतुक केले जात आहे.