शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटल्यानंतर ढसाढसा रडल्याचा प्रसंग सांगितला आहे.सदरील प्रसंग सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.शरद पवार यांच्यामुळेच माझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचे नमूद करत सुषमा अंधारेंनी इतर नेत्यांबाबत आलेला अनुभव व शरद पवारांबाबतचा अनुभव सांगितला.त्या मंगळवार ९ मे रोजी साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या फुले आंबेडकर साहित्य पंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होत्या.सुषमा अंधारे म्हणाल्या की,मी सभागृहात सांगू शकणार नाही की शरद पवारांनी माझ्यासारखी अत्यंत तळागाळातून आलेल्या मुलीसाठी काय केले आणि काय नाही व शरद पवारांमुळेच माझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित दिसत आहे.अनेक नेत्यांनी चार चार महिन्यांनी माझे मेसेज बघितले मात्र मी शरद पवारांना मेसेज केल्यावर त्यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अगदी मोठ्या भावासारखा फोन केला आणि शरद पवारांपर्यंत माहिती पोहचवली.माझ्या एका फोननंतर पुढील ६ तासात मी दिल्लीत शरद पवारांसमोर हजर होते.
शरद पवारांनी माझे म्हणणे ऐकून घेतले व कुटुंबप्रमुख भेटल्याप्रमाणे स्वतःला आवरू शकले नाही आणि मी अक्षरशः शरद पवारांसमोर रडले.त्यावेळी त्यांनी मला तातडीने तिथून मुंबईला पाठवले याचा संदर्भ शरद पवारांना आणि मला माहिती आहे.पत्र लिहिल्यापासून एका तासात शरद पवार माझ्याशी फोनवर बोलले मात्र आम्ही इतके भावनिक होतो की तुम्ही काय म्हणत आहात हेही ऐकून घेऊ शकत नव्हतो अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या आत्ता जे आमदार म्हणून निवडून आलेले लोक आहेत जे शिंदे गटातील आहेत ते बायकांविषयी अत्यंत हिणकस दृष्टीकोन बाळगतात,अश्लाघ्य पद्धतीने बोलतात.बाई म्हणजे पायातील वहाण आहे असे वागतात मग तो सत्तार असेल,शिरसाट असेल किंवा कुणीही असेल या सगळ्यांमध्ये प्रचंड मनुवादी विचार वाढलेला आहे.त्यांना सत्तेवरून खाली खेचायला हवे त्यासाठी महाविकासआघाडी हवी आणि मविआसाठी शरद पवार असायला हवेत.शरद पवार आहेत म्हणून मविआची मुठ बांधलेली आहे. म्हणून शरद पवार अध्यक्ष हवेत असेही सुषमाअंधारे यांनी स्पष्ट केले आहे.