नव्या संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही या मुद्द्यावरुन काँग्रेससह २० विरोधी पक्षांनी २८ मे रोजी होणाऱ्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे व या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर दररोज टीका केली जाते आहे.ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातूनही आज मोदींना खडे बोल सुनावले आहेत.जर विरोधकांच्या भूमिकेला महत्त्वच नसेल तर लोकशाही काय चाटायची आहे का?असा सवालही सामनातून करण्यात आला आहे तसेच राष्ट्रपतींना निमंत्रण दिलेले नाही किमान आडवाणींसाठी तरी एक कोपरा आहे का?असा खोचक प्रश्नही विचारण्यात आला आहे.भारतीय जनता पक्ष लोकांना भ्रमित करण्यात पटाईत आहे.लोकांना पेडगावचा रस्ता दाखवायचा व वेडगावला न्यायचे असे त्याचे धोरण आहे.दिल्लीत रविवारी संसद भवनाचे उद्घाटन होत असून २० विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे.बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फीत कापायचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न.संसद भवनाच्या उद्घाटनावर २० राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला यावर भाजपाचे लोक टीका करत आहेत परंतु सत्य असे आहे की २० प्रमुख पक्षांचा विरोध हा संसदेच्या उद्घाटनाला नाही तर उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे.संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणे हे परंपरेला धरुन झाले असते पण हे नवे संसद भवन मी बांधले ही माझी इस्टेट आहे तसेच उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहिल मी आणि फक्त मीच असे मोदींचे धोरण आहे.
नवे संसद भवन हे भारतीय संस्कृती आणि परंपरांशी आधुनिकतेची नाळ जोडणारी इमारत असून समृद्ध लोकशाहीचे प्रतीक असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.लोकशाहीवर या मंडळींनी बोलणे हा एक विनोद आहे.नवे संसद भवन हे काही एखाद्या पक्षाच्या मालकीचे नाही.नटवरलाल नावाच्या एका भामट्याने संसद,राष्ट्रपती भवन,ताजमहाल,इंडिया गेट बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे तसे हे नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करुन घेतले की काय? असाही प्रश्न सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.उद्घाटन सोहळ्याचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हे विरोधी पक्षांनी बोलून दाखवल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपा भजनी मंडळातल्या काही लोकांना कंठ फुटला आहे.उद्धव ठाकरेंना बोलवतेच कोण असे सवाल देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विचारले ही त्यांची टाळकुटी संस्कृती आहे.ज्या आडवाणींमुळे भाजपाला अच्छे दिन पाहायला मिळाले आहेत त्यांना तरी नव्या संसदेच्या उद्घाटनाला बोलावले आहे का? की त्यांनाही गेटवरच अडवले जाणार आहे?मुळात देशाच्या राष्ट्रपतींनाच निमंत्रण नाही तिथे तुम्हाला-आम्हाला निमंत्रण असले काय किंवा नसले काय.लोकशाहीत विरोधी पक्षांच्या भूमिकेला महत्त्व नसेल तर ती लोकशाही काय चाटायची आहे का? राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आणि देशाचे पहिले नागरिक असल्याने त्यांचा अपमान होऊ नये.नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण सर्व राजकीय पक्षांना देण्यात आले आहे.हे पक्ष आपल्या मतांनुसार निर्णय घेतील असे अमित शाह यांनी जाहीर केले याचा अर्थ कुणालाही आग्रहाचे,प्रेमाचे निमंत्रण नाही अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.