जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त इशाऱ्यानुसार दि.१९ सप्टेंबर २२ ते २३ सप्टेंबर २२ रोजी यलो अलर्ट मुळे तशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची तसेच धरणांची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्हयातील नागरिकांनी या कालावधीत सावधगिरी बाळगावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राहुल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांनी केले आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून नद्यांवरील लहान व मोठे प्रकल्पांचा धरणसाठा शंभर टक्के पूर्ण भरलेला आहे.त्यामुळे सर्व लहान व मोठे धरणांच्या खालील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शेतकरी व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.त्याचबरोबर शेतीमालाचे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी आपला शेती माल सुरक्षित ठिकाणी साठून ठेवण्याची व्यवस्था करावी.बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याबाबत हि दक्षता घ्यावी.सदर परतीचा पाऊस ताशी ३० ते ४० किलोमीटर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह कोसळणार असल्याने पावसादरम्यान वीजा व अतिवृष्टी पासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा प्रसंगी झाडाखाली,वीजवाहिनी अथवा ट्रान्सफार्मर जवळ थांबू नये.तरी नागरिकांनी याबाबत दक्षता घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.