Just another WordPress site

रायगडावर शिवसृष्टी निर्माण करण्याकरिता ५० कोटींच्या निधीची तरतूद-मुख्यमंत्र्यांची घोषणा

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! आज दि.२ जून २३ रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली असून यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले तेव्हा त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष उभारण्यासाठी शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार आहे याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटींच्या निधीची तरतूद केली असल्याची आज घोषणा करण्यात आली.तसेच प्रतापगडच्या संवधर्नाकरता प्रतापगड प्राधिकारणाची निर्मिती करण्यात येणार आहे व या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे भोसले असतील अशीही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे.त्याचबरोबर लंडनच्या संग्रहालयात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी पुढे स्पष्ट केले याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व सुधीर मुनगंटीवार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याला संधी मिळाली हा सोनेरी अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा सोनेरी दिवस आहे.मी मुख्यमंत्री म्हणून खरे म्हणजे भाग्यवान समजतो की,आजच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहता आले.महाराजांच्या सुराज्याची संकल्पना राबवण्यासाठी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली.छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद आणि प्रेरणा आपल्या पाठीशी आहेत.स्वातंत्र्य केवळ भूमीचे नसते ते माणसाचे असते याच स्वातंत्र्याचा जयजयकार करण्याची संधी मिळाली आहे.आपल्याला छत्रपतींच्या कल्पनेतील सुराज्य आणायचे आहे.शिवाजी महाराज हे पराक्रमी आणि नवराष्ट्र उभारणारे होते परंतु ते गौरवले जातात ते त्यांच्या राज्य करण्याच्या कार्यपद्धतीमुळे म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकही संधी दवडता कामा नये. आजच्या सोहळ्याला संबंध जगाचे लक्ष लागून राहिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.आजचा सोहळा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली पूजा आहे.आमच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे न्याय देणारे आहे,रयतेच्या हक्काचे रक्षण करणारे आहे अशा प्रकारची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने केली असे शिंदे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.