पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती.राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ६७ मुलींचा समावेश होता.यात ९३.८३ टक्के इतका निकाल लागला असून दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.८७ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०५ टक्के इतकी आहे.यामध्ये राज्यभरात १०० टक्के मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्याची संख्या १५१ इतकी असून त्यामध्ये पुण्यातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.टिळक रोड येथील डीईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला आहे.त्या स्कूलमधील स्वराली राजपूरकर या विद्यार्थिनीला १०० टक्के मिळाले आहेत.त्या पार्श्वभूमीवर स्वराली राजपूरकर हिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली की,मी वर्षभर दररोज दोन ते तीन तास अभ्यास करीत राहिले त्यामुळे मला ९५ ते ९८ च्या दरम्यान मार्क मिळतील अशी अपेक्षा होती पण आज ऑनलाईन रिजल्ट पाहिला त्यावेळी १०० टक्के मार्क मिळाल्याचे पाहून विश्वास बसत नव्हता.
या वर्षभराच्या काळात आई,बाबा आणि सर्व शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने मला हे यश मिळविता आल्याची भावना यावेळी तिने व्यक्त केली तसेच आता इंजिनिअरिंग किंवा मेडिकल क्षेत्रात करिअर करणार असल्याचे तिने सांगितले आहे.या परीक्षेत काही विद्यार्थांना अपयश जरी आले असेल तर त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढील तयारीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन देखील यावेळी तिने केले आहे.