जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तसेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांचा काल दि.६ जून २३ सोमवार रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला.यानिमित्ताने जळगावात आयोजित एका कार्यक्रमात गुलाबरावांचे जवळचे नेते आणि निकटवर्तीय उपस्थित होते.यावेळी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात गुलाबराव पाटील मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य केले.किशोर पाटील यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.यावेळी भाषणात आमदार किशोर पाटील म्हणाले की,गेल्या २० ते २५ वर्षांपासून मी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इथे येत आहे.आम्हाला शिवतीर्थानंतर कुठली पर्वणी असेल तरी ती म्हणजे जळगावात इथे भाऊंचा वाढदिवस साजरा करणे हा होय.त्यामुळे ५ जून ही तारीख आपल्या मनात ठासून राहिली आहे त्याचे चित्र आपण इथे स्पष्ट केले आहे.मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि भाऊंना शुभेच्छा देतो असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.