मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आगामी लोकसभेच्या ४५ व विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केलेल्या भाजपच्या वतीने राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांमध्येही भाजपने निवडणूक प्रमुख नेमले असले तरी ते शिवसेनेसाठीही काम करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दि.८ जून गुरुवार रोजी स्पष्ट केले आहे.भाजपने लोकसभेच्या सर्व ४८ आणि विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये निवडणूकप्रमुखांची नियुक्ती केली आहे त्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे.शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार वा आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुख नेमण्यात आले असले तरी आगामी निवडणूक भाजप आणि शिवसेना युती करून लढणार असल्याने शिवसेनेच्या उमेदवारांनाही हे प्रमुख मदत करतील असे बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी श्रीकांत भारतीय व केशव उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.काही मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये वादावादी होऊ शकते.निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली तरीही निवडणूकप्रमुखही पक्षाकडे उमेदवारी मागू शकतात.निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली म्हणजे निवडणूक लढविण्याचा मार्ग बंद झालेला नाही असेही पक्षाने स्पष्ट केले आहे.
यात लोकसभा मतदारसंघांच्या प्रमुखांच्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव सुमीत वानखेडे यांचा समावेश करण्यात आला आहे.वानखेडे हे विधानसभा लढण्याच्या तयारीत असले तरी भाजपच्या विद्यमान आमदाराने वानखेडे यांना आतापासूनच विरोध सुरू केला आहे.पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ इच्छूक असले तरी त्यांना पुणे मतदारसंघाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.अकोला मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांचीच मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे तर डॉ.श्रीकांत शिंदे प्रतिनिधित्व करीत असलेल्या कल्याण मतदार संघासाठी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.डोंबिवली या बालेकिल्ल्यात प्रज्ञेश प्रभूघाटे यांना संधी देण्यात आली आहे.विधानसभेसाठी प्रमुख नेमताना गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले आहे.मागाठाणे या शिंदे गटाचा आमदार असलेल्या मतदारसंघाची जबाबदारी प्रवीण दरेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे या मतदारसंघावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जाते.परळी मतदारसंघातून गेल्या वेळी पंकजा मुंडे पराभूत झाल्या होत्या या मतदारसंघाच्या प्रमुखपदी पंकजा यांची बहिण खासदार प्रितम मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच नागपूर-प्रवीण दटके, बारामती-आमदार राहुल कूल,पुणे-मुरलीधर मोहोळ,मावळ-आ.प्रशांत ठाकूर,रत्नागिरी-सिंधुदुर्ग-प्रमोद जठार,उत्तर मुंबई-आमदार योगेश सागर,मुंबई उत्तर-पश्चिम-अमित साटम,ईशान्य मुंबई-भालचंद्र शिरसाट,मुंबई उत्तर मध्य-आमदार पारग आळवणी,दक्षिण-मध्य मुंबई-आमदार प्रसाद लाड,दक्षिण मुंबई-मंत्री मंगलप्रभात लोढा,संभाजीनगर-समीर राजूरकर,नाशिक-केदार अहेर.यातील ठळक घडामोडी पुढीलप्रमाणे आहेत.निवडणूक प्रमुखपदाच्या यादीत मंगलप्रभात लोढा या एकमेव मंत्र्याचा समावेश.लोकसभा मतदारसंघांसाठी नियुक्त केलेल्या प्रमुखांमध्ये एकाही महिला नेत्याचा समावेश नाही.लोकसभा मतदारसंघांच्या प्रमुखांच्या यादीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे खासगी सचिव सुमीत वानखेडे यांचा समावेश.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघासाठी शशिकांत कांबळे.पक्षाच्या खासदार,आमदारांशी सल्लामसलत करूनच निवडणूक प्रमुखांची नेमणूक करण्यात आली असून खासदार वा आमदार तसेच निवडणूक प्रमुख यांच्यात वाद होणार नाही याची पक्षपातळीवर खबरदारी घेण्यात यावी असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.