शरद पवार पाठोपाठ संजय राऊत आणि सुनील राऊत यांना “सकाळची पत्रकार परिषद बंद करा,अन्यथा गोळ्या घालू,”म्हणत जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून “तुमचा दाभोळकर होणार,”अशी धमकी ट्वीटद्वारे शरद पवारांना दिली गेली आहे.अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.“सकाळची पत्रकार परिषद बंद करा,अन्यथा गोळ्या घालू,”अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सुनील राऊत यांनी दिली आहे.दि.८ जून गुरूवार रोजी ४ ते ४.१५ च्या दरम्यान तीन ते चार फोन आले त्याने मला आणि संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली.महिन्यात तुम्हाला गोळ्या घालून स्मशानात पाठवू.सकाळची पत्रकार परिषद बंद करा,अन्यथा दोघांना जीवे मारू,” असे सुनील राऊत यांनी सांगितले आहे.परिणामी अशा धमक्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून बोलले जात आहे.
गेले अनेक दिवस झाले अशाप्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.सरकारला त्याची जाणीव करून दिली आहे परंतु सरकार याबाबत कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही.महाविकास आघाडीचे प्रमुख नेते संजय राऊतांना नष्ट करण्याची सुपारी सरकारने घेतल्याचे वाटते असा गंभीर आरोप सुनील राऊत यांनी केला आहे ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.शरद पवारांना मिळालेल्या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की,मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांना न्याय मागतेय जर काही झाले तर त्याला जबाबदार फक्त देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय असेल असा इशाराच सुप्रिया सुळेंनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारला दिला आहे.