मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने शेवटचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे.शिवसेना आणि शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी मुंबई महापालिकेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने उद्याच या याचिकेवर तातडीची सुनावणी ठेवली आहे.त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार की नाही,याचा फैसला उद्या दि.२२ सप्टेंबर २२ रोजी होण्याची शक्यता आहे.मुंबई महापालिका आयुक्त व जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्याविरोधात शिवसेनेची रिट याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रमेश धनुका यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ किंवा न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणीची शक्यता आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरुन सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटात लढाई सुरु आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली होती.अजित पवार यांनीही शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी,अशी मागणी केली आहे.उद्धव ठाकरेंनी आणखी काही दिवस परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.दसरा मेळाव्याची वेळ जवळ आली आहे.५ऑक्टोबर २२ ला हा मेळावा होणार आहे.त्यामुळे आता उच्च न्यायालयात जाऊन परवानगी घेण्यात यावी.यापूर्वीही अशाप्रकारे परवानग्या घेण्यात आल्या आहेत.शिंदे गटाला बीकेसी येथे मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे.मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांना मिळावी.राज्यातील जनतेला दोघांचेही विचार ऐकायला मिळतील,असे अजित पवार यांनी म्हटले आहे.