मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना १९६६मध्ये केल्यापासून दरवर्षी दादरमधील शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन होत आहे.त्यानंतर मुंबई हायकोर्टानेही वेळोवेळी शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.तरीही यंदा कारण नसतांना मुंबई महापालिका परवानगी देण्यास विलंब करीत आहे.त्यामुळे तात्काळ परवानगी देण्याचा आदेश पालिकेला द्यावा अशी विनंती शिवसेनेने मुंबई हायकोर्टात रिट याचिकेद्वारे केली आहे.न्यायमूर्ती रमेश धनुका व न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठाने याचिकेचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्या दि.२२ सप्टेंबर २२ गुरुवार रोजी तातडीची सुनावणी ठेवण्यात आली आहे.शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी शिवसेनेने पालिकेकडे २२ व २६ ऑगस्ट २२ रोजी अर्ज सादर केलेले आहेत.तरीही पालिकेकडून परवानगी दिली जात नसल्याने आणि विधी विभागाकडे विषय पाठवून निर्णय प्रलंबित ठेवला असल्याने शिवसैनिकांमध्ये धाकधूक वाढत आहे. ५ ऑक्टोबर २२ ला दसरा मेळावा असून पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणेही आवश्यक आहे. हे लक्षात घेता शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी ॲड.जोएल कार्लोस यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. तर ज्येष्ठ वकील ॲस्पी चिनॉय हे शिवसेनेतर्फे युक्तिवाद मांडणार आहेत.याचिकेत मुंबई महापालिका आयुक्त व जी-उत्तर वॉर्डचे सहायक आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे १९६६ सालापासून दसरा मेळावा होत आहे.शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने त्या ठिकाणी खेळाव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांना बंदी घालावी,अशा विनंतीची जनहित याचिका २००९मध्ये हायकोर्टात करण्यात आली होती. त्यानंतरही कोर्टाने दसरा मेळावा व अन्य विशिष्ट कार्यक्रमांना अटींसह परवानगी दिलेली आहे.२०१५मध्ये मनसेने कोर्टात विरोध दर्शविल्यावरही कोर्टाने शिवसेनेला परवानगी दिली होती.त्यानंतर राज्य सरकारने २० जानेवारी २०१६ रोजी एमआरटीपी कायद्याअंतर्गत अधिसूचना काढून शिवाजी पार्कवर वर्षभरात विशिष्ट कार्यक्रमांना परवानगी दिली.त्यातही दसरा मेळाव्याचा स्पष्ट उल्लेख आहे.त्यानुसार केवळ करोना संकटामुळे साल २०२० व २०२१ वगळले तर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आला आहे.शिवसेनेने अर्ज केल्यानंतर खरे तर पालिकेने ७२ तासांत परवानगी देणे अपेक्षित आहे.पण यंदा अर्ज करून २० दिवस उलटल्यानंतरही महापालिकेने कोणतेही कारण नसताना परवानगी देण्याचा निर्णय लांबवला आहे.त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव कोर्टात दाद मागावी लागत आहे असे म्हणणे शिवसेनेने आपल्या याचिकेत मांडले आहे.त्यामुळे आता उद्या दि.२२ सप्टेंबर २२ गुरुवार रोजीच्या सुनावणीत काय होते याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.