Just another WordPress site

अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार ! शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांचा दावा

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आपण अमरावती जिल्‍ह्यातील शिवसैनिकांच्‍या संपर्कात असून युतीमध्‍ये अमरावती लोकसभा मतदारसंघ गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्‍ला राहिलेला आहे त्‍यामुळे अमरावती लोकसभेचा खासदार शिवसेनेचाच होणार ! असा दावा शिवसेनेच्‍या शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.येत्‍या निवडणुकीत विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्‍या विजयाचा मार्ग सुकर व्‍हावा यासाठी आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍यात समेट घडून आल्‍याची चर्चा काही माध्‍यमांमध्‍ये सुरू असताना अभिजीत अडसूळ यांनी ही चर्चा बिनबुडाची असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.अमरावती शिवसेनेचा बालेकिल्‍ला आहे आणि २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीतसुद्धा राहील आम्‍ही कुणाशीही तडजोड केली नाही आणि करणार नाही असे अभिजीत अडसूळ यांनी म्‍हटले आहे.
आनंदराव अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍यामधील वाद सर्वश्रुत आहे.२०१९ च्‍या निवडणुकीत नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.राज्‍यात सत्तांतरानंतर अडसूळ यांनी शिवसेनेच्‍या पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला.ठाकरे गटातून त्‍यांची हकालपट्टी करण्‍यात आली त्‍यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्‍याचा निर्णय घेतला.मध्‍यंतरीच्‍या काळात अडसूळ यांना ईडीच्‍या नोटीस बजावण्‍यात आल्‍या त्‍याचीही बरीच चर्चा झाली होती.राणा दाम्‍पत्‍याने भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे तर अडसूळ हे एकनाथ शिंदे यांच्‍या बाजूने आहेत.अडसूळ आणि राणा दाम्‍पत्‍य हे शिंदे-फडणवीस सरकारचे समर्थक असले तरी लोकसभेसाठी दोघांमध्‍ये स्‍पर्धा अजूनही असल्‍याचे अभिजीत अडसूळ यांच्‍या वक्‍तव्‍यातून ध्‍वनित झाले आहे.आनंदराव अडसूळ यांच्या पराभवामागे भाजपाचाच हात असल्याचा आरोप अभिजीत अडसूळ यांनी गेल्‍या निवडणुकीनंतर लगेच केला होता.भाजपाचे अनेक नगरसेवक मतदानाच्या वेळी बेपत्ता होते असेही अभिजीत अडसूळ यांचे म्हणणे होते.आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर न्यायालयाने निकाल देताना जात प्रमाणपत्र रद्द करून नवनीत राणा यांना दोन लाखांचा दंड ठोठावला होता.या निकालास राणा यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान दिले होते हे प्रकरण सध्‍या न्‍यायप्रविष्‍ट आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.