अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
परतवाडा ते धारणी राज्य महामार्गावर अमरावतीहून मध्यप्रदेशातील खंडवा येथे जाणारी एसटी बस मेळघाटातील घटांग नजीक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला दहा ते बारा फूट दरीत उलटली ही बस झाडांना अडकल्याने मोठा अपघात टळला असून या अपघातात बसचालकासह ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.अमरावती खंडवा ही एसटी महामंडळाच्या अमरावती आगाराची बस परतवाडा येथून निघाल्यानंतर आज दि.१२ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घटांग नजीक एका वळणावर दरीत उलटली.या अपघाताची माहिती मिळताच चिखलदरा,परतवाडा तसेच समरसपुरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने अपघातस्थळी पोहोचले सदर बसमध्ये एकूण ६४ प्रवासी होते.बसचालक मोहम्मद मुजाहिद याच्यासह ७ प्रवासी या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.
सदरील अपघातातील जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तर बसचालकाला परतवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे.बस उलटून रस्त्याच्या खाली दरीत १० ते १५ फुटांवर मोठ्या झाडांना अडकली त्यामुळे जीवितहानी झाली नाही तर इतर प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले आहे.