“वारकऱ्यांवरील लाठीहल्ला पाहून पांडुरंगाच्या काळजाचेही पाणी पाणी झाले असेल.बा…पांडुरंगा,कमरेवर हात ठेवून तुझ्या भक्तांवर आलेले हे संकट फक्त पाहू नकोस,अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकव…”असे साकडे घालत ठाकरे गटाची सत्ताधाऱ्यांवर टीका
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला यामुळे वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त केला जात आहे तसेच विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.यावरून ठाकरे गटानेही आज “बा विठ्ठला अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकव” असे साकडेच देवा चरणी घातले आहे सामना अग्रलेखातून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले आहे.वारकऱ्यांवर आळंदीत निर्घृण असा लाठीमार झाला आहे.आळंदीतून ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होणार होते.हजारो वारकरी त्यासाठी गळ्यात तुळशीमाळा घालून,कपाळास अबीरबुक्का लावून,खांद्यावर पताकांचे भार घेऊन जमले.तोंडाने ‘ग्यानबा तुकाराम’,‘रामकृष्ण हरी’ हा नाममंत्र जपत ते दंग झाले असतानाच त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला.महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते असे ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.“भाव तैसे फळ। न चाले देवापाशी बळ। तुका म्हणे केले। मन शुद्ध हे चांगले।।”तुकोबाच्या मंदिरात भारतीय जनता पक्षाने राजकीय बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला व त्यातून वारकऱ्यांना लाठीमाराचा प्रसाद खावा लागला.तीर्थक्षेत्र आळंदी येथे नेमके काय घडले ते वारकऱ्यांकडून त्यांच्याच शब्दांत समजून घेतले पाहिजे.वारकरी सांगतात,”संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होता हा संपूर्ण सोहळा राजकीय स्वार्थासाठी हायजॅक करण्यात आला.भाजपचा आध्यात्मिक आघाडीचा भोंदू आचार्य तुषार भोसले व मिंधे गटाचा अक्षय शिंदे या लोकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्यात हस्तक्षेप सुरू केला.मानाच्या दिंड्या व फडकरी यांना अपमानास्पद वागणूक दिली.मर्जीतल्याच लोकांना प्रवेश दिला यावरून वादावादीस सुरुवात झाली.वारकऱ्यांच्या भावना समजून न घेता डुप्लिकेट वारकरी तुषार भोसले याने चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अरेरावी सुरू केली त्यातून रेटारेटी झाली व वारकऱ्यांना पोलिसांनी बदडले असेही यात म्हटले आहे.
या सर्व प्रकरणास डुप्लिकेट वारकरी तुषार भोसले हाच जबाबदार आहे याच भोसलेने आधी त्र्यंबकेश्वरात जाऊन तेथील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला व आता आळंदीत वारकऱ्यांशी अरेरावी करू लागला.महाराष्ट्राच्या इतिहासात वारकरी संप्रदायावर पालखी सोहळ्यात असा लाठीमार झाला नव्हता.हिंदुत्वाच्या नावाने छाती पिटणाऱ्या व गळे फोडणाऱ्या मिंधे-फडणवीसांच्या राजवटीत हे घडले आहे. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच.महाराष्ट्राला वारीची ३०० वर्षांची परंपरा आहे.३०० वर्षांत कधीही न झालेली गोष्ट फडणवीस-शिंदे यांनी करून दाखवली आहे.सरकारचे म्हणणे आहे,लाठीमार झालाच नाही.सरकारच्या बुबुळांच्या गारगोट्या झाल्या आहेत त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे.वारकऱ्यांवरील मारहाणीचे,लाठीमाराचे ‘व्हिडीओ’ समोर आले तरीही गृहमंत्री फडणवीस म्हणतात असे काही झालेच नाही.काय म्हणावे या खोटेपणास? भाजपच्या तथाकथित आध्यात्मिक आघाडीचा तुषार भोसले हा वारकऱ्यांवर दबाव आणून भाजपास हवे ते करून घेण्याच्या प्रयत्नात होता व त्याच्यामुळेच आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसी हल्ला झाला. त्यामुळे या तुषार भोसलेवर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.वारकऱ्यांवरील हल्ल्याच्या करुण कहाण्या स्वतः वारकऱ्यांनीच समोर येऊन सांगितल्या पण आळंदीत लाठीमार झाला नाही तर किरकोळ झटापट झाल्याच्या चिपळ्या सरकारतर्फे वाजवल्या जात आहेत अशी टीका सामनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात पास देण्यावरून वाद झाला,७५ जणांनाच पास देण्याचे ठरले होते असे आता सांगितले जाते पण या पास वितरणाचा ताबा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने घेतल्याने गोंधळास सुरुवात झाली हेच सत्य आहे.मंदिरात ठराविकच संख्येने प्रवेश देण्यावरून वारकरी व प्रशासनात वाद झाला असेल तर वारकरी संप्रदायास विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात सरकार कमी पडले.येथे राजकीय घुसखोरीचा प्रयत्न झाला व आळंदीतील शांततेला तडा गेला.गेल्या कित्येक वर्षांची परंपरा अशी की,वारी शिस्तीत व शांततेत पुढे जात असते.पोलीसही वारकरी म्हणूनच वारीत सहभागी होतात,हातात टाळ घेऊन श्रीहरीचे नामस्मरण करतात,फुगड्या घालतात हे चित्र आम्ही वर्षानुवर्षे पाहत आहोत त्या परंपरेस आताच गालबोट लागले.श्री.फडणवीस म्हणतात ते वेगळे व प्रत्यक्ष चित्र वेगळे.फडणवीस यांनी चुकीच्या लोकांचे समर्थन करण्याचे सोडले पाहिजे असेही यात म्हटले आहे.महाराष्ट्रातील जनता अनेक देव-देवतांची पूजा करते आणि दरवर्षी अनेक सण-उत्सव साजरे करते पण महाराष्ट्राचे अंतःकरण जर खरे कशामध्ये गुंतले असेल तर ते फक्त ‘युगे अठ्ठावीस’ विटेवरी उभ्या राहिलेल्या पांडुरंगाच्या समचरणावर! पंढरीच्या विठोबाच्या पायाशी उधार काहीच नसते त्यामुळे त्याच्या भेटीसाठी निघालेल्या भक्तांवरचा निर्घृण हल्ला त्याने पाहिलाच आहे व ही उधारी पांडुरंग सव्याज परतफेड केल्याशिवाय राहणार नाही.वारकऱ्यांवरील लाठीहल्ला पाहून पांडुरंगाच्या काळजाचेही पाणी पाणी झाले असेल.बा… पांडुरंगा,कमरेवर हात ठेवून तुझ्या भक्तांवर आलेले हे संकट फक्त पाहू नकोस, अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकव… हेच तुझ्या चरणी साकडे! असे साकडेही यामाध्यमातून घालण्यात आले आहे.