अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ सहा जूनला निर्माण झाले.चक्रीवादळाला आठ दिवस,नऊ तास झाले आहेत.१५ जूनला सायंकाळपर्यंत ते टिकण्याची शक्यता आहे तसे झाल्यास ते अरबी समुद्रातील आजवरचे सर्वात जास्त काळ टिकलेले चक्रीवादळ ठरणार आहे.यापूर्वी अरबी समुद्रात २०१९ मध्ये ‘क्यार’ हे तीव्र चक्रीवादळ तयार झाले होते ते नऊ दिवस आणि पंधरा तास टिकले होते.२०१८मध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘गजा’ चक्रीवादळ नऊ दिवस,पंधरा तास टिकले होते.जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून चक्रीवादळांची संख्या वाढत आहे असेही हवामान विभागाने म्हटले आहे.रत्नागिरीत अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केलेली नाही.अत्यंत संथ गतीने मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू आहे.रत्नागिरी,सिंधुदुर्गमध्ये अद्याप पाऊस सुरू झालेला नाही.कोकण किनारपट्टीवर केवळ सोसाटय़ाचा वारा वाहत आहे.हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा राज्यातील मोसमी पावसावर कोणताही परिणाम होणार नाही.पण सध्या मोसमी वाऱ्यांची वाटचाल संथगतीने सुरू आहे.हवामान विभागाने बुधवारी कोकण-गोव्यात सोसाटय़ाचा वारा वाहून काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा इशारा दिला आहे.मध्य महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींचा अंदाज आहे.