मुंबई: दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळणार की नाही?याचा निकाल आता लांबणीवर पडला आहे.उच्च न्यायालयात आज दि.२२ रोजी यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली.मात्र त्यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेने दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांना परवानगी नाकारली.त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या याचिकेविरुद्ध न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली.त्यामुळे उच्च न्यायालयाने ही सुनावणी शुक्रवार म्हणजे दि.२३ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे.सुधारित याचिकेची प्रत प्रतिवादींना द्यावी असे निर्देश देत खंडपीठाने उद्या दुपारी सुनावणी ठेवली आहे.
यावेळी शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली.तर शिवसेनातर्फे ज्येष्ठ वकील ऍस्पि चिनॉय यांनी युक्तिवाद केला. पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठ्ये यांची बाजू मांडली.यावेळी शिवसेनेच्या वकिलांनी सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप अर्ज केल्याने त्यालाही आव्हान देण्यासाठी याचिकेत सुधारणा करण्याची परावानगी द्यावी अशी मागणी केली.तर पालिकेचे वकील मिलिंद साठ्ये यांनी म्हटले की याचिकेत अर्जावर निर्णय देण्याची विनंती आहे. निर्णय दिला आहे त्यामुळे याचिका सुनावणीयोग्य नाही ती निरर्थक ठरली आहे. त्यावर शिवसेनेच्या वकिलांनी आक्षेप घेतला.याचिकेत विनंती नसून परवानगी देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती आहे.त्यामुळे याचिका सुनावणीयोग्य आहे.आम्ही त्याबद्दलचा युक्तिवाद करु असे शिवसेनेच्या वकिलांनी म्हटले.न्यायालयाने ही विनंती मान्य करत याप्रकरणात उद्या सुनावणी ठेवली आहे.
शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत दसरा मेळाव्याचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर काही वर्षांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती.तेव्हापासून काही अपवाद वगळता शिवसेनेचा दसरा मेळावा हा कधीच चुकलेला नाही.त्यामुळे दसरा मेळावा हा शिवसेनेच्या परंपरेचा भाग झाला होता.आजपर्यंत शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेची परवानगी मिळणे हा केवळ औपचारिकतेचा भाग होता परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील एक मोठा गट फोडल्याने पहिल्यांदाच शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला होता.अशातच उद्धव ठाकरे गटाच्या पाठोपाठ शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्याने पेच निर्माण झाला होता.गेल्या काही दिवसांमध्ये शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेने हरप्रकारे प्रयत्न केले होते.मुंबई महानगरपालिका दसरा मेळाव्याला परवानगी देणार नाही, हे दिसताच शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.