मुंबई-पोलीस नायक न्युज (वृत्तसेवा):-शिवाजी पार्कवर यंदा होणारा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.कारण या मैदानावर मेळाव्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे अर्ज शिवसेनेतील ठाकरे व शिंदे या दोन गटांकडून दाखल करण्यात आले होते.मात्र कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.त्यामुळे आम्ही दोन्ही अर्जदारांना परवानगी नाकारत आहोत असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेने परवानगी नाकारली असली तरी शिवसेनेने यासाठी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.दरवर्षीप्रमाणे दादरमधील शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडे २२ ऑगस्टला अर्ज करूनही परवानगी मिळाली नसल्याने कोंडी झालेल्या शिवसेनेने अखेर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.अर्ज केल्यानंतर ७२ तासांत परवानगी अपेक्षित असताना पालिकेने एक महिना होऊनही परवानगी दिलेली नाही.परिणामी आम्हाला न्यायालयात येणे भाग पडले आहे अशी कैफियत मांडत तत्काळ परवानगी देण्याचा आदेश पालिकेला देण्याची विनंती शिवसेनेने याचिकेत केली आहे.याबाबत न्या. रमेश धनुका व न्या. कमल खाटा यांच्या खंडपीठासमोर आज गुरुवारी प्राथमिक सुनावणी होणार आहे.