तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक नुकसानाबद्दल हेक्टरी दोन लाख रूपये मदत द्या-शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात शेतकरी बांधवांना काही दिवसापुर्वीच अवकाळी गारपीटसह पाऊस व वादळाचा आसमानी सुलतानी असा प्रचंड फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन बिगर विमाधारक शेतकऱ्यांना केळी पिकाच्या नुकसानीचे २ लाख रुपये सरसकट भरपाई शासनाने द्यावी या शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) च्या वतीने तहसीलदार यांच्याकडे नुकतेच देण्यात आले आहे.
याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यात व परिसरात मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक अवकाळी पाऊस व वादळीवारा झाल्याने मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादक शेतकरी यांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे त्यांना विमा कंपनीकडून दिलासा मिळाला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही लागवडीच्या खर्चामुळे व आर्थिक अडचणीमुळे विमा हप्ता भरू शकलेले नाही अशा शेतकऱ्यांना शासनाने ( केळी पिकास )प्रति हेक्टरी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देवुन त्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानाबद्दल त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे.यावेळी ओढवलेल्या तिव्रतापमान,अवकाळी गारपीट,प्रचंड वेगाने आलेल्या वादळ या तिहेरी संकटात शेतकरी बांधव सापडलेले असुन या संकट काळातुन उभारणीसाठी शेतकऱ्यांना नवीन केळी लागवडीस जाचक अटी त्रुटी दुर करून सरकट अनुदान देण्यात यावे तसेच या आसमानी संकटात सापडलेल्या बिगर विमा शेतकऱ्यांचे पालकतत्व स्विकारून शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातुन बाहेर काढावे.नवीन कापुस लागवडीला देखील आता सुरूवात होत असून अशावेळी पेरणी तोंडावर आली असतांना शेतकऱ्यांच्या हाती पैसा नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.तरी चारही बाजुने चिंतेत व तणावात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतुन बाहेर काढुन अशा शेतकऱ्यांच्या कापसाची प्रति क्विंटल १५ हजार रूपयेप्रमाणे हमीभावाने खरेदी करून आर्थिक संकटातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना (ठाकरे ) गटाच्या वतीने नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर शिवसेना (ठाकरे गट)यावल शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले,शरद कोळी,सागर देवांग,संतोष धोबी,पप्पु जोशी,माजी सेना तालुका प्रमुख कडु पाटील,बेबाबाई पाटील,डॉ. विवेक अडकमोल,विजय पंडीत,हुसैन तडवी,योगेश चौधरी,प्रविण लोणारी,भरतसिंग राजपुत यांच्या स्वाक्षरी आहेत.