“सख्खे भाऊ पक्के वैरी” दिव्यांग जिल्हाध्यक्षांना भावांकडूनच जीवे ठार मारण्याची धमकी,न्याय मिळणेसाठी गोपाल शर्मा यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
तेल्हारा पोलिसांकडून टाळाटाळ;न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा
अकोला-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
आजच्या घडीला मालमत्ता,पैसा व आपली प्रतिष्ठा मिळविण्याकरिता प्रत्येक जण चढाओढ करीत असून याकरिता वाट्टेल ते करण्यास प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे याकरिता नात्यागोत्यांना मूठ माती देऊन काहीही करण्यास अपप्रवृत्ती डोके वर काढू पहात आहे अशीच घटना तेल्हारा तालुक्यातील रहिवाशी युवा स्वाभिमान पार्टी अकोला दिव्यांग जिल्हाध्यक्ष तसेच पोलीस नायक साप्ताहिकाचे अकोला जिल्हा प्रतिनिधी गोपाल शर्मा यांना “सख्खे भाऊ पक्के वैरी” या उक्तीनुसार त्यांच्याच सख्ख्या भावांकडून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांना सतत अमानुष त्रास दिला जात असल्याने त्यांना न्याय मिळावा याकरिता गोपाल शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच तक्रार दाखल केली असून न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशाराही तक्रारी अर्जाद्वारे गोपाल शर्मा यांनी दिला आहे.
याबाबत निवेदनात नमूद केले आहे की,गोपाल शर्मा हे युवा स्वाभिमान पार्टी अकोला दिव्यांग जिल्हाध्यक्ष तसेच पोलीस नायक साप्ताहिकाचे अकोला जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.आपला भाऊ आपल्यापेक्षा पुढे निघून जाईल या भावनेतून त्यांचे दोघे भाऊ नामे कपिल शर्मा वय-३६ वर्षे व रवींद्र शर्मा वय-३८ हे गोपाल शर्मा यांना जीवे ठार मारण्याचा कट रचत असून तेल्हारा पोलीस त्यांना मदत करत आहेत.गोपाल शर्मा दिव्यांग असल्यामुळे त्यांच्यासोबत तेल्हारा पोलीस भेदभाव करीत असून त्यांच्या दोन्ही भावांना तेल्हारा पोलीस पाठीशी घालत आहेत परिणामी तेल्हारा शहरात कायदा व सुव्यवस्थाचे धिंडवडे निघत आहे तसेच केंद्र व महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग हक्क अधिकार सुरक्षा कायदा २०१६ अंतर्गत दखलपात्र गुन्हे दाखल करण्याकरिता तेल्हारा पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे असे अर्जात म्हटले आहे.तक्रारीत नमूद केले आहे की,दि.१२ जून २३ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचे लहान भाऊ कपिल शर्मा यांनी गोपाल शर्मा यांना ५०००/- रुपयांची मागणी केली सदरील रक्कम देण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला नंतर त्यांना फ्रीजेची चाबी मागितली ती चाबीहि देण्यास नकार दिल्याने कपिल शर्मा याने चिडून घरातील लोखंडी मुसळ गोपाल शर्मा यांच्या डोक्यावर मारून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र गोपाल शर्मा यांनी स्वतःचा जीव वाचण्यासाठी बाजूला सरकल्यामुळे मोठा अनर्थ टळला त्यानंतर त्याने कपाटाचे हँडल लोखंडी मुसळ मारून तोडून टाकले व त्या कपाटामधील २०००/-रुपये चोरून नेले आहे तसेच गोपाल शर्मा यांचे कपडे व कागदपत्रे कुठेतरी फेकून दिलेले आहेत हा घडलेला प्रकार गोपाल शर्मा यांनी अमरावती येथे पोलीस कंट्रोल रूमला कळविल्यावरही त्यांच्याकडून अद्यापि कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
गोपाल शर्मा दिव्यांग असल्यामुळे स्वतःच्या मेहनतीवर अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय करून स्वतःचे जीवन जगत आहे त्यासोबतच युवा स्वाभिमान पार्टी अकोला दिव्यांग जिल्हाध्यक्षपद व पोलीस नायक या साप्ताहिक वर्तमानपत्राचे अकोला जिल्हा प्रतिनिधीपद त्यांना मिळालेले असून ते दोन्ही पदाचे काम इमानदारीने करत आहे.केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनाची माहिती दिव्यांग बांधवांना देणे व त्यांची मदत करणे,सहकार्य करणे हे ते करत आहे तसेच पोलीस नायक या साप्ताहिक वृत्तपत्राकरिता बातम्या लिहून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे हे काम ते निर्भीडपणे करत आहे.तेल्हारा पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे त्यात त्यांच्यावर तेल्हारा पोलीस राग करीत आहे.केंद्र व महाराष्ट्र सरकार यांनी बनवलेला सुरक्षा कायदा २०१६ चे अधिनियम ४९ ची कलम ९२ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना त्रास देणे,मारहाण करणे,शिवीगाळ करणे व इतर कोणत्या प्रकारचा त्रास देणे धमकावने हे सर्व गुन्हे दखलपात्र असूनही तेल्हारा पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांग हक्क अधिकार सुरक्षा सुरक्षा कायदा २०१६ चे पालन तेल्हारा पोलीसांकडून करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.गोपाल शर्मा यांच्या घरामध्ये जानेवारी २०२३ पासून दोन्ही भाऊ रवींद्र शर्मा वय ३८ व कपिल शर्मा वय ३६ यांचे वडिलांसोबत घराच्या हिशेसाठी वाद सुरू आहे व गोपाल शर्मा हा दिव्यांग असल्यामुळे त्याच्यासोबत घरामध्ये भेदभाव करण्यात येत आहे. त्याला विनाकारण त्रास देणे,जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे,वारंवार धमक्या देणे,शिवीगाळ करणे,अपमान जनक वागणूक देणे,घरामध्ये जेवण न करू देणे,पाणी पिऊ न देणे,दैनंदिन काम न करू देणे असे प्रकार त्यांच्याकडून करण्यात येत आहेत याबाबत वेळोवेळी तेल्हारा पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यात आली असून तेल्हारा पोलीस दखलपात्र गुन्ह्याची नोंद न करता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत आहे व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे.तेल्हारा पोलिसांकडून गोपाल शर्मा यांना अपमानजनक वागणूक दिल्या जात असून त्यांनी केलेल्या तक्रारीवर कोर्टात जाण्याचा सल्ला दिला जात आहे.
याबाबत गोपाल शर्मा यांनी नुकतीच जिल्हाधिकारी साहेबांकडे लेखी तक्रार केली असून या तक्रारीमध्ये त्यांनी वारंवार त्रास देऊन कपिल शर्मा यांनी कपाटातील दोन हजार रुपये चोरले असून त्यांचे कपडे व कागदपत्रे कुठेतरी फेकून दिले असल्यामुळे त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी तसेच कपिल शर्मा व रवींद्र शर्मा यांच्या विरोधात वारंवार तक्रार देऊनही तेल्हारा पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक न केल्यामुळे व पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी तेल्हारा पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर दिव्यांग हक्क अधिकार सुरक्षा कायदा २०१६ च्या अंतर्गत तेल्हारा पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व कपिल शर्मा व रवींद्र शर्मा यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा गोपाल शर्मा यांनी दिला आहे.सदरील तक्रारी निवेदनाच्या प्रति मा.श्री.एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री,मा.श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री,मा.श्री.रमेशजी बैस राज्यपाल महाराष्ट्र,मा.विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र,मा.अतिरिक्त पोलीस महासंचालक मुंबई,मा.जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला,मा.अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आयोग,मा.अध्यक्ष राज्य मानवाधिकार आयोग,मा.आयुक्त अपंग कल्याण विभाग पुणे,मा.अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय दिल्ली येथे पाठवण्यात आल्या असल्याचे तक्रारी अर्जात नमूद करणात आले आहे.