“ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल तेव्हा दोन्ही गटात मारामाऱ्या झालेल्या दिसतील” ! -अमोल मिटकरी यांची स्पष्टोक्ती
मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विविध तारखा सांगितल्या जात आहेत मात्र अद्यापही हा मंत्रीमंडळ विस्तार खोळंबलेला आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील भेटीगाठीही वाढलेल्या दिसत असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही मंत्र्यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे ते नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.अमोल मिटकरी म्हणाले की,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वारंवार दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत कारण अमित शाहांनी सांगितले आहे की तुमच्या मंत्रिमंडळातील संजय राठोड,संदीपान भुमरे,तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील या वादग्रस्त मंत्र्यांना आवर घाला किंवा यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही मंत्रीमंडळ विस्तार करणार नाही म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जात आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे जोपर्यंत या पाच मंत्र्यांची हकालपट्टी करत नाहीत विशेषतः अब्दुल सत्तारांबद्दल केंद्रात प्रचंड नाराजी आहे याबाबत देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्ट सांगितले आहे की अब्दुल सत्तार यांच्यामुळे भाजपाची प्रतिमा डागाळली आहे.गिरीश महाजन यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते यात त्यांनी १० मंत्रीपदे आम्ही देऊ आणि कुणाला मंत्रीपद द्यायचे याचे अधिकार एकनाथ शिंदेंना असतील असे त्यांनी म्हटले अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे.याचा अर्थ पाच मंत्र्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत भाजपाकडून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ब्रेक लागला आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल तेव्हा दोन्ही गटात मारामाऱ्या झालेल्या दिसतील ! असेही मिटकरी यांनी नमूद केले आहे.