Just another WordPress site

“वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या-पालख्या निघाल्या असून २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या दिंड्या चालत पंढरपुरात दाखल होतील.दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत शेकडो किलोमीटर अंतर पार करून पंढरपूरला जातात परंतु या प्रवासादरम्यान अनेकदा वारकरी आजारी पडतात,दुखापतग्रस्त होतात,एखाद्या अपघातात किंवा दुर्घटनेत लोकांचा मृत्यू होतो या सर्व वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने विमा संरक्षण दिले आहे.पंढरपूरच्या या आषाढीवारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे.सदरील वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण राहणार असल्याचे याबाबत नमूद करण्यात आले आहे.

यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करतांना सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.