डाॅ सतीश भदाणे,पोलीस नायक
अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :-
चोपडा यावल रोडवरील शहर पो.स्टे.हद्दीत असणाऱ्या गुळी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून याठिकाणी काल दि.२१ रोजी सायंकाळी लोखंडी सळईचे पिलर उभे करत असतांना वजनाचा अंदाज न आल्याने तोल जाऊन मजुराच्या अंगावर लोखंडी आसारीचा ढीग पडल्याने त्याखाली दबून एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की,सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत असणाऱ्या बजेटमधून सदर नवीन पुलाच्या कामासाठी सुमारे चार कोटींच्या वर निधी उपलब्ध झाला असून अमळनेर येथील ठेकेदाराच्या माध्यमातून सदरील काम घेतले आहे.गूळ नदी शेजारी सुरू असलेल्या या नवीन पुलाचे पिलर उभे करत असतांना उभ्या असलेल्या लोखंडी आसारी कोसळल्याने तिथे काम करणारा मजूर उत्तम भाईदीत वय ३८ वर्षे रा.नादिया ता.जिल्हा चकदा पश्चिम बंगाल या मजुराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सदरील काम सुरू असताना तिथे कोणताही साईट इंजिनियर किंवा ठेकेदार हजर नव्हते अशी माहिती घटनास्थळी असलेल्या मजुरांनी दिली आहे.याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ठेकेदार गणेश ठाकरे अमळनेर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद आहे.सदरील मयत मजुरावर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रुग्णवाहिकेद्वारे त्याचे शव पश्चिम बंगाल येथे पाठवण्यात आले आहे.यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता सर्वच ठेकेदारांनी आता मजुरांचा विमा काढणे आवश्यक असून तसा शासकिय नियम असतांना सदर ठेकेदाराने विमा काढला नसल्याचे सांगितले यामुळे मयत मजुराला कोणतीही शासकीय मदत मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.