“आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”
औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पंढरपूर गावातील नागरिकांचा महत्त्वपूर्ण निर्णय
आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.२९ जून रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे परंतु याच दिवशी मुस्लीम समुदायाचा पवित्र सण बकरी ईदही आहे त्यामुळे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत.सदरहू औरंगाबाद जिल्ह्यातील पंढरपूर या गावातील नागरिकांनी बकरी ईद साजरी न करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आली असून बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बकरीची कुर्बानी देतात तर आषाढी वारीला वारकऱ्यांचा उपवास असतो त्यामुळे हिंदू बांधवांचा अवमान होऊ नये यासाठी औरंगाबादमधील पंढरपूर येथील गावकऱ्यांनी बकरी ईद आषाढी वारीच्या दिवशी साजरी करण्याऐवजी दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला सांगितले आहे की,२९ तारखेला आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे त्याच दिवशी मुस्लीम बांधवांची बकरी ईद आहे त्यामुळे आमच्या गावातील सर्व मौलाना आणि जुम्मेदार लोकांनी असा निर्णय घेतला आहे की बकरी ईदची कुर्बानी ३० जून रोजी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाईल. आमच्या गावात आषाढी वारीला १२ ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मुस्लीम समुदायाला विनंती करतो की,बंधुभावाचा संदेश सर्वत्र पोहोचवा आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करा.बकरी ईद साजरी करण्यासाठी आपल्याला तीन दिवसांचा अवधी आहे त्यामुळे आपण २९ ऐवजी ३० तारखेला बकरी ईद साजरी करावी अशी विनंती मी संपूर्ण मुस्लीम समुदायाला करतो.आमच्या गावात आम्ही २९ तारखेला कसलीही कुर्बानी देणार नाही तर दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी केली जाईल असेही शेख अख्तर यांनी म्हटले आहे.