महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले असून शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा केला जात आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.महाविकास आघाडी सरकार पाडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्लॅन कसा आखला? आणि याबाबत गुप्तता कशी पाळली होती? याचा सविस्तर खुलासा रवींद्र चव्हाण यांनी केला आहे.यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली असून त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या मुलाखतीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अंबादास दानवे ट्वीटमध्ये म्हणाले की,“द गद्दार फाईल्स” लोकशाही मार्गाने आलेले सरकार कसे लबाडी करून मोदी-शाहांच्या भाजपाने पाडले हे त्यांच्याच गोटातील मंत्र्याने ओकले आहे.वाघाचे कातडे पांघरून हे लांडगे जनतेची फसवणूक करत आहेत योग्य वेळी जनताच हे कातडे फाडून काढेल आणि त्यांना उघडे करेल.काय म्हणावे या सत्ता असुरांना तुम्हीच सांगा? असा प्रश्न दानवे यांनी जनतेला केला आहे.रवींद्र चव्हाण यांनी’लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीनुसार सुरतला गेल्यानंतर बंडखोर आमदारांचे फोन काढून घेण्यात आले होते.बंडखोर आमदारांची कार कोण चालवतेय हेही संबंधित आमदारांना माहीत नव्हते.आमदारांना टीव्हीही पाहू दिला नाही.गुवाहाटीला गेल्यानंतर आमदारांना टीव्ही बघण्याची परवानगी देण्यात आली.या ऑपरेशनमध्ये छोटी चूक झाली असती तरी हे ऑपरेशन सपशेल अपयशी ठरले असते.बंडखोरीच्या वाटाघाटींची कल्पना एकनाथ शिंदे यांच्या मुलाला देण्यात आली नव्हती.भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने त्या पद्धतीने गोपनीयतेचा आदेश दिला होता असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.