Just another WordPress site

“लवकरच रास्त भाव दुकानांमध्ये नागरिकांना बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध होणार” !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

लवकरच रास्त भाव दुकानांमध्ये नागरिकांना बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बँका,इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकांसह सूचीबद्ध खासगी बँकांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यामध्ये सुमारे ५३ हजारांपेक्षा अधिक रास्त भाव दुकाने असून त्याचा फायदा शहरासह ग्रामीण भागातील जनतेला होणार असल्याचे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याने कळवले आहे.१ सप्टेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात सुलभ,परवडणारी, आणि विश्वासार्ह बॅंक बनविण्याच्या दृष्ट‍िकोनातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकची सुरुवात केली.धन हस्तांतरण,थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी),बिल भरणा,आरटीजीएस आदी सुविधा या बॅंकेतर्फे देण्यात येतात त्याच पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानांमध्ये बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत तसेच या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होणार आहे.या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये जागरुकता निर्माण करून जेथे शक्य असेल तेथे बँकेच्या सेवा सुरू करण्यात येणार आहे.शिधावाटप दुकानदारांना ऐच्छिकरित्या बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार आहे.स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच शहरासोबत ग्रामीण भागातील नागरिकांनाही या उपक्रमातून लाभ होणार आहे असे राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.