“राज्यात औरंगाजेबाच्या नावाने दिलेल्या घोषणा चालणार नाहीत”,नवनीत राणा यांचा असदुद्दीन ओवैसी यांना थेट इशारा
एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीने ओवैसी यांनी अलीकडेच बुलढाणा येथे जाहीर सभा घेतली होती व या सभेत औरंगाजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.यावर विविध राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून औरंगाजेबाच्या नावाने दिलेल्या घोषणाबाजीचा निषेध केला आहे.विशेष म्हणजे बुलढाणा येथील सभेत औरंगाजेबाच्या नावाने कसलीही घोषणाबाजी झाली नाही असे स्पष्टीकरण स्वत: असदुद्दीन ओवैसी यांनी दिले आहे.प्रसारमाध्यमांमधून खोट्या बातम्या पसरवल्या जात असून मुस्लिमांचा द्वेष केला जात आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.ओवैसी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही हा वाद थांबत नसून अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी ओवैसी यांना थेट इशाराच दिला आहे.महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे यांचे सरकार नाही त्यामुळे तुमच्या घोषणा आणि भडकाऊ भाषणे ऐकून घेतली जाणार नाहीत.ओवैसींनी आपल्या मर्यादेत राहावे.राज्यात औरंगाजेबाच्या नावाने दिलेल्या घोषणा चालणार नाहीत असा इशारा नवनीत राणा यांनी दिला त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ओवैसींना लक्ष्य केले आहे.
संबंधित व्हिडीओत नवनीत राणा यांनी म्हटले आहे की,“मागील काही दिवसांपासून असदुद्दीन ओवैसी सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत ते कधी औरंगजेबाच्या नावाने घोषणा देतात तर कधी व्यासपीठावर उभे राहून भडकाऊ भाषण देतात परंतु ओवैसी यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार नाही जिथे तुमच्या घोषणा किंवा भडकाऊ भाषणे ऐकून घेतली जातील त्यामुळे ओवैसींनी आपल्या मर्यादेत राहावे ती मर्यादा पार करण्याचा प्रयत्न करू नये.महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात येथे ओवैसींचे भडकाऊ भाषण आणि औरंगजेबाच्या घोषणा चालणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि त्यानंतरच महाराष्ट्रात येण्याची हिंमत दाखवावी असा सज्जड इशारा खासदार नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसी यांना दिला आहे.