Just another WordPress site

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दि.२८ रोजी मुंबईत बैठक

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दि.२८ जून बुधवार रोजी मुंबईत बैठक होणार असून आगामी लोकसभा निवडणुकीत तीनही पक्षांच्या संभाव्य जागावाटपाबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक दुपारी तीन वाजता होत असल्याचे सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.महाराष्ट्रात भाजपने लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीनेसुद्धा राज्यात निवडणुकांची तयारी चालविली आहे तसेच भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचेही राज्याच्या विविध भागात दौरे सुरू आहेत.महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी स्वतंत्रपणे पक्षांतर्गत लोकसभा निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे यामुळे उद्या प्रथमच महाविकास आघाडीच्या निवडक नेत्यांची बैठक पवार यांच्या निवासस्थानी होत आहे.

या बैठकीला काँग्रेस पक्षातर्फे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खा.संजय राऊत उपस्थित राहण्याची शक्यता आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ चंद्रपूरची एकमेव जागा मिळाली होती यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे काय सूत्र ठरते याविषयी महाविकास आघाडीत औत्सुक्य आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान लोकसभेत चार खासदार आहेत यात रायगडमधून सुनील तटकरे,बारामतीतून सुप्रिया सुळे,सातारा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील आणि शिरुर लोकसभेतून डॉ.अमोल कोल्हे निवडून आले आहेत.२०१९च्या निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते तथापि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर बहुतांश खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत.अमरावती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने नवनीत राणा ह्या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या सध्या त्या भाजपसोबत आहेत यामुळे अमरावतीच्या जागेवर राष्ट्र्रवादी काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे.दरम्यान पाटणा येथील विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीनंतर राज्यातील तीन पक्षांची पहिल्यांदा बैठक होत आहे यामध्ये आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकांना कसे सामोरे जायचे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.