Just another WordPress site

‘निवडणुकीनंतरच्या बदलांसाठी शिंदे गट तयार”? दीपक केसरकर यांचे सूतोवाच

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील तपशील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी २०१९ साली अजित पवारांबरोबर घेतलेल्या शपथेपासून ते एकनाथ शिंदेंना दिलेले मुख्यमंत्रीपद आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीतील युतीची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या सर्व मुद्द्यांवर भाष्य केले आहे यात फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे राज्यात नव्या चर्चेला उधाण आले आहे.देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत बोलताना पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचे नमूद केले असले तरी  मात्र यावेळी एकनाथ शिंदे हेच निवडणुकीनंतर युतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील का? याविषयी त्यांनी स्पष्ट भूमिका न घेता पक्षातील वरिष्ठांकडे बोट दाखवले असल्यामुळे नेमके भाजपामध्ये काय चालले आहे याविषयी चर्चा सुरू झाली आहे.जर निवडणुकांनंतर आमच्या पक्षाला कोणता दुसरा निर्णय घ्यायची गरज असेल तर पक्ष तो निर्णय घेईल परंतु मला वाटत नाही की,दुसरा कुठला निर्णय घेण्याची गरज आहे व कोण मुख्यमंत्री असेल हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना विचारायला हवे कारण भाजपामध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेत असून यासंदर्भात काही बोलण्याचाही अधिकार मला नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

दरम्यान यामुळे एकनाथ शिंदेंच्या नावावर अद्याप पुढील मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाले नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची नेमकी काय भूमिका आहे? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली होती त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.मुख्यमंत्री कोण असेल हे दोघांनी मिळून ठरवायचे आहे याआधी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे की,आम्ही युती म्हणून एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊ.निवडणूक झाल्यानंतर काही बदल होणार असतील तर ते दोघांनी आणि वरीष्ठ नेत्यांनी बसून ठरवले पाहिजे परंतु आज तरी जे दोन्ही पक्षांमध्ये ठरले आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वत: जाहीर केले आहे त्यानुसार युती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे असे म्हणत निवडणुकीनंतरच्या बदलांसाठी शिंदे गट तयार असल्याचे सूतोवाच दीपक केसरकरांनी दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.