गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी)
तेल्हारा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून सुमारे तीन ते चार वर्षापासून अकोट आगाराची बस सेवा बंद करण्यात आलेली असल्याने अजून किती वर्ष अकोट आगाराची बस सेवा तेल्हारा शहरासाठी बंद राहणार? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.सदरहू अकोट आगाराच्या मनमानी कारभारामुळे तेल्हारा शहरातील प्रवासीवर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून याला जबाबदार कोण? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानास जबाबदार कोण? एकीकडे महाराष्ट्र सरकार” प्रवाशी वाढवा” “गाव तिथे एसटी बस सेवा”अशा विविध घोषणा करत असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु अकोट आगाराच्या मनमानी कारभारामुळे उत्पन्न तर वाढतच नाही उलट आर्थिक नुकसानही होत आहे याला जबाबदार कोण? असे विविध प्रश्न तेल्हारा शहरातील प्रवाशी वर्गातून उपस्थित केले जात आहेत.तरी अकोट आगाराने बंद केलेल्या तेल्हारा शहरात येजा करण्याऱ्या बसेस तात्काळ सुरु करून प्रवाशांची समस्या सोडवावी अशी आग्रही मागणी तेल्हारा शहरवासियांकडून करण्यात आली आहे.
तेल्हारा आगाराची बस तेल्हारा हिवरखेड मार्गे अकोट येथे अखंडीतपणे बस नेहमी सुरू असूनही अकोट आगाराची बस तेल्हारा शहरात येत नसल्याने हा संशोधनाचा विषय बनला आहे.सदरील अकोट आगाराची बस तीन ते चार वर्षापासून तेल्हारा शहरात येत नसल्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेसला जाणारे विद्यार्थी,दिव्यांग,जेष्ठ नागरिक,व्यापारी वर्ग,न्यायालयीन कामकाजासाठी व दवाखान्याच्या कामानिमित्ताने जाणाऱ्या प्रवाशी वर्गाला खाजगी वाहनाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.यात तेल्हारा आगाराच्या बसमध्ये प्रवाशी जास्त होत असल्याने प्रवाशांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद-विवाद होत असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे तेल्हारा आगाराची बस नेहमी फुल भरून येजा करीत असून अकोट आगाराची बस बंद का? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून उपस्थित केला जात आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तूर्त लक्ष पुरवून तेल्हारा शहरासाठी अकोट आगाराची एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी तेल्हारा शहरातील प्रवाशीवर्गातून करण्यात आली आहे.