“आगामी निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ या पक्षचिन्हावरच लढवणार” – अजित पवार यांची भूमिका
अजित पवार यांनी पुन्हा एकदा अचानक राजकीय सूत्र हलवत थेट विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात उडी घेतली असून इतकेच नाही तर स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाही आपल्याबरोबर येण्यास भाग पाडले आहे आणि त्यांनाही मंत्रीपदाची शपथ दिली आहे.यानंतर अजित पवार यांनी २ जुलै रविवार रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.अजित पवारांनी सुरुवातीला हा निर्णय घेण्यामागील पार्श्वभूमी आणि कारणे सांगितली.यानंतर पत्रकारांनी वारंवार शरद पवार यांचा पाठिंबा आहे का? शरद पवारांशी चर्चा झाली आहे का? शरद पवार यांना फोन केला होता का? असे प्रश्न विचारले मात्र या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार यांनी थेट शरद पवारांचा उल्लेख करणे टाळले तसेच सर्वांचा पाठिंबा आहे सर्वांशी फोनवर बोललो सर्वांचा आशीर्वाद आहे अशी उत्तरे दिली आहेत.
अजित पवारांनी राष्ट्रवादीतील सगळ्यांशी चर्चा केली आहे असे सांगितले परंतु शरद पवारांशी चर्चा केली का असे विचारले असता अजित पवारांनी सगळ्यांमध्ये सगळे येतात असे सावध उत्तर दिले आहे.अनेकदा प्रश्न विचारूनही त्यांनी प्रत्येकवेळा शरद पवार या दोन शब्दांना बगल दिली.राष्ट्रवादी काँग्रेस पुढील सर्व निवडणुका भाजपा-शिंदे गटाबरोबरच लढणार का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले विधानसभा,लोकसभा निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ या पक्षचिन्हावरच लढवणार आहोत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेते निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.